जिल्ह्यात बापलेकासह तिघांचा वीज पडून मृत्यू

By Admin | Updated: June 11, 2017 00:59 IST2017-06-11T00:59:48+5:302017-06-11T00:59:57+5:30

नाशिक : सिन्नर तालुक्यातील चोंढी येथे वीज पडून बापलेकाचा त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्यातही पोही येथे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला

Three people died due to Baplake in the district | जिल्ह्यात बापलेकासह तिघांचा वीज पडून मृत्यू

जिल्ह्यात बापलेकासह तिघांचा वीज पडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिन्नर तालुक्यातील चोंढी येथे वीज पडून बापलेकाचा त्याचप्रमाणे नांदगाव तालुक्यातही पोही येथे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमध्ये दोन जण जखमी झाले आहेत.
सिन्नर तालुक्यातील चोंढी येथे करंजी रस्त्याच्या कडेला मवाळ कुटुंबाची वस्ती आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यामुळे चारा झाकण्यासाठी रघुनाथ कोंडाजी मवाळ (४५) त्यांचा मुलगा मयूर व पुतण्या प्रशांत गंगाधर मवाळ घरातून बाहेर आले. चाऱ्यावर प्लॅस्टिकचा कागद टाकत असतांना अचानक वीज कडाडली व त्यांच्या अंगावर कोसळली. यात रघुनाथ मवाळ (४५) व त्यांचा मुलगा मयूर (१८) जागीच ठार झाले. तर पुतण्या प्रशांत भाजला.
वीज पडल्यानंतर कुटुंबातील सदस्य व शेजारच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना रुग्णालयात नेले. तथापि, रघुनाथ मवाळ व मयूर यांचा मृत्यू झाला होता. तर जखमी प्रशांत याच्यावर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
मवाळ हे तिघा भावांचे एकत्रित कुटुंब आहे. मयत रघुनाथ मवाळ वारकरी संप्रदायाचे होते तर त्यांचा मुलगा मयूर हा वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महामहाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो नुकताच बारावी इयत्तेत गेला होता.
दुपारी अडीच वाजता कोणाच्या ध्यानीमनी नसतांना अचानक वीज अंगावर कोसळून मवाळ बाप-लेकाचा मृत्यू झाला. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. पालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर तहसीलदार नितीन गवळी यांच्यासह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली होती. सायंकाळी सिन्नर नगरपालिका रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर चोंढी येथे पिता-पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Three people died due to Baplake in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.