रेल्वेने तीन लाख भाविक दाखल; दोन लाख परतलेही
By Admin | Updated: September 13, 2015 22:27 IST2015-09-13T22:27:02+5:302015-09-13T22:27:41+5:30
रेल्वेने तीन लाख भाविक दाखल; दोन लाख परतलेही

रेल्वेने तीन लाख भाविक दाखल; दोन लाख परतलेही
नाशिकरोड : कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीचे शाहीस्नान आटोपल्यानंतर रेल्वे व रस्तामार्गे जवळपास दोन लाखांहून अधिक भाविक पुन्हा रवाना झाले. तर सुमारे तीन लाख भाविक रेल्वेमार्गे नाशिकमध्ये दाखल झाले होते.
नाशिकरोड रेल्वेस्थानकांवर शनिवारी मध्यरात्रीपासून रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर दाखल झालेले भाविक हे पहाटे अडीच-तीनच्या सुमारास सिन्नर बाजूकडून बाहेर पडले. हजारो भाविक स्नानासाठी निघाल्याने एसटी बसेस, रिक्षा कमी पडल्या होत्या. यामुळे काही भाविक पायी-पायी रामघाट व तपोवनच्या दिशेने निघाले होते. भाविकांची झालेली गर्दी बघता पोलीस प्रशासनाने तत्काळ जादा बसेस एसटी महामंडळाकडून पाचारण केल्याने भाविकांची झालेली अडचण दूर झाली. पहाटे स्नान झाल्यानंतर भाविक पुन्हा परतीच्या मार्गाला निघाले होते. सकाळी १०-११ वाजेनंतर परतीच्या मार्गावरील भाविकांचा ओघ वाढला होता, तर दुपारनंतर एसटी बसेस, रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहनांमध्ये अक्षरश: प्रचंड दाटीवाटीत भाविक रेल्वेस्थानकावर दाखल होत हाते. पुणे बाजूकडून रस्ता मार्गे खासगी वाहनाने आलेले भाविकदेखील फार मोठ्या संख्येने परतीच्या मार्गावर होते. चिंचोली नाका बाह्य बसस्थानक, सिन्नरफाटा बसस्थानक व सिन्नरफाटा येथील त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी असलेले बसस्थानक
येथून भाविकांना घेऊन गेलेल्या बसेस सकाळी ११ वाजेपासून पुन्हा भाविकांना घेऊन येत होत्या. दुपारनंतर काठेगल्ली व मुंबई नाका महामार्ग बसस्थानक येथे परतीच्या प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने नाशिकरोड भागातून जादा रिकाम्या बसेस भाविकांना घेण्यासाठी पाठविल्या होत्या. बिटको चौकातून रिक्षाचालकांना रेल्वेस्थानकाच्या दिशेने सोडण्यास पोलिसांनी नियोजनामुळे मज्जाव केला होता. (प्रतिनिधी)
रेल्वे, बसस्थानकांवर तोबा गर्दी
दुपारनंतर परतीच्या भाविकांची रेल्वे मालधक्का, स्थानक व चिंचोली नाका बाह्य बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. मालधक्का आवारात सायंकाळी १५ ते २0 हजार भाविक रेल्वेच्या प्रतीक्षेत ताटकळून पडले होते. मालधक्क्यावरून भाविक रेल्वेस्थानकात जाऊ देण्यासाठी मोठा गोंधळ करत असल्याने रेल्वे पोलिसांवरील कामाचा ताण व टेन्शन खूप वाढले होते. चेंगराचेंगरी व काही गडबळ गोंधळ होऊ नये म्हणून भाविकांना ध्वनीक्षेपकांवरून सतत सूचना करण्यात येत होत्या.
रेल्वे मार्गे परतीचे प्रवासी देवळालीगाव मालधक्का येथून रेल्वेस्थानकांवर सोडण्यात येत होते. रिक्षाचालकांनी भाविकांना देवळालीगाव राजवाडा येथे न सोडता बिटको चौक व महात्मा गांधी रोडवर मध्येच सोडून दिल्याने भाविकांना चांगलीच पायपीट करण्याची वेळ आली होती. तर रेल्वेच्या परतीच्या भाविकांना सत्कार पॉईंट देवळालीगावपर्यंत एसटी बसने सोडण्याचे नियोजन होते. मात्र परतीचे एसटीचे नियोजन फसल्याने भाविकांना पायपीट करत मोठा त्रास सहन करावा लागला.