चांदवडच्या रेणुकादेवी घाटात अपघातात तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:08 IST2020-01-19T23:24:15+5:302020-01-20T00:08:54+5:30
चांदवड येथील रेणुकादेवी मंदिर घाटात नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रेलरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. गांगुर्डे कुटुंबीयांवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

चांदवडच्या रेणुकादेवी घाटात अपघातात तीन ठार
चांदवड : येथील रेणुकादेवी मंदिर घाटात नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रेलरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दांपत्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी
घटना घडली. गांगुर्डे कुटुंबीयांवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,
या तिघांवर नाशिकरोड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाशिकरोड, जेलरोड येथील नितीन भीमाजी गांगुर्र्डे (३६), पत्नी पूजा नितीन गांगुर्डे (३०) आणि मुलगी अथर्वी (३) हे दुचाकीने (क्र. एमएच जीएस ०१७६) लखमापूर, ता. सटाणा येथील विवाह समारंभ आटोपून उमराणेमार्गे मुंबई आग्रारोडने नाशिककडे जात होते. त्यांच्या दुचाकीला मागून येणाºया ट्रेलरने (क्र. सीजी ०४/ जेए ४५२७) जोरदार धडक दिल्याने हे तिघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर ट्रेलरचालक रतनसिंग फिरोजसिंंग (रा. मुंबई) याने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र परिसरातील नागरिकांनी सदर ट्रेलर मंगरूळ टोलनाक्यावर पकडला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका १०८ रुग्णवाहिकेने सर्व मृतदेह चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले.
मृतांच्या नातलंगाना घटनेची माहिती मिळताच त्यांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात धाव घेत एकच हंबरडा फोडला. पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.