सायखेडा : नाशिक महानगरपालिका, सिन्नर नगरपरिषद व निफाड नगरपरिषद येथून पकडून आणलेले मोकाट कुत्री गोदाकाठ भागात सोडल्याने या परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातील पिसाळलेल्या काही कुत्र्यांनी चावा घेतल्याने चांदोरी येथील सागर टर्ले यांच्या तीन गायी दगावल्या आहेत. अन्य चार गायींनाही कुत्र्याने चावा घेतला आहे. यासंदर्भात टर्ले यांनी सायखेडा येथील वैद्यकीय अधिकारी यांना बोलवले असता त्यांच्याकडे पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर द्यावयाची लस उपलब्ध नसल्याने मुक्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे.गोदाकाठ भागात गोदावरी नदीचे खोरे असल्याने वनविभागातर्फे येथे अनेकदा बिबटे सोडले जातात, असा ग्रामस्थांचा आरोप असल्याने या आरोपाला जोड म्हणून या भागात फिरणारी मोकाट कुत्रीही शहरी भागातील पकडून आणलेली आहेत अशी चर्चा सुरू आहे. गावात, शेतात या मोकाट कुत्र्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. अनेकवेळा कुत्री शेतातील उभ्या पिकात घुसून नासाडी करतात, तर लहान मुले, जनावरे, मेंढ्यांच्या कळपांवरही हल्ले चढवतात, मोकाट कुत्र्यांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत काही कुत्रे पिसळलेली आहेत. मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.चांदोरी येथील सागर टर्ले यांच्या गोठ्यातील तीन गायींना कुत्र्याने चावा घेतला ही कुत्री पिसाळलेली असल्याचे उशिरा लक्षात आले. यावेळी टर्ले यांनी सायखेडा येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांना बोलवले. डॉक्टरांनी तपासणी केली पिसाळलेले कुत्रे चावल्याचे निदान झाले; मात्र लस उपलब्ध नसल्याने उपचार करता आले नाही. त्यामुळे तीनही गायी दगावल्या.
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने चांदोरी येथे तीन गायी दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:14 IST