देवळा येथे तीन घरफोडीच्या घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:07 IST2018-11-03T16:06:51+5:302018-11-03T16:07:10+5:30
देवळा : घरातील माणसे बाहेरगावी गेली असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना देवळा येथे घडली. घरातील माणसे परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दाराचा कोयंडा तोडून एकाच रात्री तीन घरे फोडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

देवळा येथे तीन घरफोडीच्या घटना
देवळा : घरातील माणसे बाहेरगावी गेली असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडल्याची घटना देवळा येथे घडली. घरातील माणसे परगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दाराचा कोयंडा तोडून एकाच रात्री तीन घरे फोडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहर व उपनगरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असुन अद्यापपर्यंत शहारात सी.सी.टिव्हि कॅमेरे बसविलेले नसल्याने नागरीकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे.
२९ आॅक्टोबर रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या दरम्यान देवळा शहरातील आयडीयल इंग्लिश स्कुलचे संचालक गोरख रतन अहेर यांच्या शाळेच्या कार्यालयाचा दरवाजा फोडून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रूपयांची रोकड चोरून नेली.
ह्याच परीसरातील रिहवासी हनुमंत काशिनाथ आहीरे यांच्या घराचा दरवाजा तोडून २० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. शिवाजीनगर येथे राहणारे सेवानिवत्त प्राध्यापक आर. के. पवार हे बुधवारी पत्नीसह बाहेर गेले होते. रात्री घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी गेटचे कुलुप तोडले. मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडुन आत प्रवेश केला व कपाटातील दोन मोती, चांदीची भांडी असा सात हजार रूपयांचा ऐवज चोरीन नेल्याची माहिती प्रा. पवार यांनी दिली आहे.
गोरख अहेर यांच्याकडे झालेल्या चोरीचे सी.सी. टि. व्ही. फुटेज प्राप्त झाले असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
शहरात ज्यष्ठ नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी हया घटनांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. शहर व उपनगरांमध्ये सी.सी. टि. व्ही यंत्रणा त्वरीत बसविण्यात यावी व पोलिसांनी गस्त वाढवावी.
- प्रा.आर.के. पवार ( सदस्य, ज्येष्ठ नागरीक. )
शहर व परिसरातील गस्त वाढवून तिची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी शहरातील व उपनगरातील चौकांमध्ये हजेरी पुस्तक ठेवण्यात येणार असून गस्ती पथकातील कर्मचार्याने नियमतिपणे त्यात स्वाक्षरी करावयाची आहे.
- सुरेश सपकाळे. (पोलिस निरीक्षक, देवळा. )