मालेगावातून कार चोरणाऱ्या तिघांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 01:41 IST2021-08-14T01:39:35+5:302021-08-14T01:41:00+5:30

मालेगाव शहरालगतच्या दाभाडी रस्त्यावरुन एका मंगल कार्यालयाजवळून ७ लाख ६५ हजार रूपये किंमतीची कार चोरणाऱ्या तिघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे.

Three arrested for stealing car from Malegaon | मालेगावातून कार चोरणाऱ्या तिघांना कोठडी

मालेगाव शहरातून कार चोरणाऱ्या तिघा संशयितांसमवेत कॅम्प विभागाचे पाेलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, पोलीस निरीक्षक प्रविण वाडीले व पथक.

मालेगाव : शहरालगतच्या दाभाडी रस्त्यावरुन एका मंगल कार्यालयाजवळून ७ लाख ६५ हजार रूपये किंमतीची कार चोरणाऱ्या तिघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव, पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या २५ जुलै रोजी मंगल कार्यालयाच्या आवारातून अज्ञात चोरट्यांनी अरुण पवार यांच्या मालकीची कार क्रमांक एमएच ४१ एएस ६९०२ चोरून नेली होती. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिसांनी तपास करुन संशयित आरोपी देवा अरुण पवार (२१) रा. सौंदाणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने गाडी चोरल्याची कबुली दिली. यावरुन राहुल देवीदास वाघ (२१) रा. तिसगाव, ता. देवळा, मयूर दिलीप चौधरी (२२) रा. निंबाळे, ता. चांदवड, हल्ली मुक्काम नाशिक यांनाही अटक करण्यात आली. या कार चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे, हवालदार रवीराज गवंडी, नितीन बाराहाते, कैलास सोनवणे, विजय घोडेस्वार, नरेंद्रकुमार कोळी, योगेश कोळी, संजय पाटील, वासुदेव नेरपगार, किरण पाटील आदींनी केला आहे.

 

Web Title: Three arrested for stealing car from Malegaon