हजारो भाविक रेल्वेने रवाना
By Admin | Updated: August 29, 2015 23:21 IST2015-08-29T23:21:29+5:302015-08-29T23:21:29+5:30
हजारो भाविक रेल्वेने रवाना

हजारो भाविक रेल्वेने रवाना
नाशिकरोड : कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीनिमित्त देशाच्या विविध भागातून आलेले भाविक पुन्हा परतीच्या मार्गासाठी दुपारपासून निघाल्याचे चित्र दिसत होते. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत हजारो भाविक रेल्वेने पुन्हा रवाना झाले.
सिंहस्थ-कुंभमेळा व पहिल्या पर्वणीच्या शाही स्नानानिमित्त गेल्या काही दिवसांपासून शेकडो भाविक रेल्वेने शहरात दाखल होत होते. गेल्या दोन-तीन दिवसांत दीड-पावणेदोन लाख भाविक रेल्वेमार्गाने नाशिकला आले होते. पहिल्या पर्वणीचे शाहीस्नान आटोपल्यानंतर शहराच्या विविध भागांतून भाविक पुन्हा रेल्वेने जाण्यासाठी नाशिकरोडला येण्यास सुरुवात केली होती. यामुळे रस्त्यावरून पायी चालणाऱ्या, रिक्षातून येणाऱ्या भाविकांचे जथ्थे ठिकठिकाणी दिसत होते. रेल्वे सुरक्षा दलाने पर्वणीनिमित्त लांब पल्ल्याच्या कुंभमेळा स्पेशल रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३ व ४ वर आलेल्या भाविकांना नियोजनानुसार सिन्नर फाटा नवीन रेल्वे मार्गाने स्थानकाबाहेर काढले. तर पुन्हा परतीच्या प्रवासासाठी येणाऱ्या भाविकांना रेल्वे मालधक्का येथूनच रेल्वेस्थानकांत सोडण्यात आले. दुपारनंतर पुन्हा परतणाऱ्या भाविकांची रेल्वेस्थानक व मालधक्क्यावर मोठी गर्दी झाल्याने काहीकाळ गोंधळ झाला होता. मात्र रेल्वे सुरक्षा दल व रेल्वे पोलिसांच्या अधिकारी, कर्मचारी यांनी मालधक्क्यावर आलेल्या भाविकांना टप्याटप्याने थांबवुन अत्यंत यशस्वीरीत्या रेल्वेस्थानकावर सोडले. त्यामुळे रेल्वेस्थानकांवर गर्दीमुळे होणारा गोंधळ टळला. काटेकोट पद्धतीने लावलेला बंदोबस्त व जी रेल्वे येईल तिच्याच मार्गाने जाणाऱ्या भाविकांना सोडण्यात येत असल्याने दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत हजारो भाविक रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघाले होते. (प्रतिनिधी)
.