नांदूरमधमेश्वरच्या जलाशयात फुलले सहस्त्र कमळपुष्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:29 IST2020-07-13T20:12:33+5:302020-07-14T02:29:23+5:30
नाशिक : निसर्गात उमलणाऱ्या विविध प्रजातींची फुले मानवाला नेहमीच आकर्षित करतात. तसेच जैवविविधतेत फुलांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. राज्यातील पहिले ‘रामसर’ आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविणारे नाशिक जिल्ह्यातील पाणस्थळ अर्थात नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या जलाशयावर यंदा शेकडोंच्या संख्येने राष्ट्रीय फूल असलेली कमळाची फुले दीड एकरात फुलली आहेत.

नांदूरमधमेश्वरच्या जलाशयात फुलले सहस्त्र कमळपुष्प
नाशिक : (अझहर शेख ) निसर्गात उमलणाऱ्या विविध प्रजातींची फुले मानवाला नेहमीच आकर्षित करतात. तसेच जैवविविधतेत फुलांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. राज्यातील पहिले ‘रामसर’ आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविणारे नाशिक जिल्ह्यातील पाणस्थळ अर्थात नांदुरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या जलाशयावर यंदा शेकडोंच्या संख्येने राष्ट्रीय फूल असलेली कमळाची फुले दीड एकरात फुलली आहेत.
अभयारण्यात आठवडाभरापासून दीड एकराच्या बेटांवर सहस्त्र कमळ दलपहावयास मिळत आहेत. दरवर्षी अभयारण्यात पावसाळ्याच्या प्रारंभी कमळ फुललेला दिसतो. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून पर्यटकांसाठी अभयारण्याच्या वाट बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कमळ पक्षाचे वाढले प्रजनन कमळाची फुले यंदा जास्त संख्येमुळे फुलल्याने या बेटाकडे स्थानिक स्थलांतरित लांब शेपटीचा कमळपक्षी देखील मोठ्या प्रमाणात आकर्षिला गेला. या ठिकाणी आता जकाना पक्ष्याकडून प्रजननही सुरू आहे. या पक्ष्याचा हा विणीचा काळ असल्यामुळे त्यासाठी हे वातावरण अत्यंत पोषक ठरत आहे.
गंगापूर, दारणा धरणांमधून सातत्याने सोडले जाणारे आवर्तन आणि पावसाचे पाणी यामुळे नांदुरमधमेश्वर बंधाºयाच्या बॅकवॉटरपर्यंत जलस्तर टिकून राहिला. त्याचाच फायदा म्हणजे यंदा कमळाची फुले मोठ्या संख्येने बहरलेली दिसून येतात. दीड एकरच्या क्षेत्रात सुमारे दोन ते अडीच हजार कमळांची फुले उमलली असून, या फुलांचा हंगाम आक्टोबरपर्यंत चालणार आहे.
-------------------
लॉकडाऊनमुळे पर्यटक येणे बंद झाले तसेच चोख गस्तीमुळे मच्छीमारांचाही वावर थांबविण्यास यश आले. काही महिन्यांपूर्वी कमळ बेटाभोवती बांबू व बाइंडिंग तारेचे संरक्षण केल्यामुळे रानडुकरांचा त्रास कमी झाला. यंदा अभयारण्यात जलस्तर टिकून राहिल्याने कमळ चांगला फुलला. स्थानिक लोकांनीसुद्धा या जलवनस्पतीच्या संवर्धनासाठी हातभार लावावा.
- भरत शिंदे, सहायक वनसंरक्षक
-------------------
भारताचे राष्ट्रीय फूल
कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. निसर्गातील अत्यंत सुंदर असलेल्या या जलवनस्पतीला ‘निलंबो न्युसिफेरा’ या शास्त्रीय नावाने जगभर ओळखले जाते. गोड्या व उथळ पाणस्थळावर ही वनस्पती प्रामुख्याने आढळून येते. जुलै ते आक्टोबर असा या वनस्पतीचा फुलण्याचा कालावधी आहे.