दिंडोरीत २० हजार हेक्टर पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:14 IST2019-11-06T13:14:02+5:302019-11-06T13:14:11+5:30
दिंडोरी : यंदा सलग सुरू असलेल्या पावसाने व गेल्या पंधरवड्यातील परतीच्या पावसाने निम्म्याहून अधिक जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.

दिंडोरीत २० हजार हेक्टर पिकांना फटका
दिंडोरी : यंदा सलग सुरू असलेल्या पावसाने व गेल्या पंधरवड्यातील परतीच्या पावसाने निम्म्याहून अधिक जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. तालुक्यात १६५०० हेक्टर द्राक्ष, ६५०० हेक्टर टोमॅटो भाजीपाला तर १८५९४ हेक्टर खरीप पिकांची लागवड झालेली आहे. तालुक्यात पूर्व व पश्चिम अशी भौगोलिक रचना असून पश्चिम भागात भात, नागली, वरई, भाजीपाला तर पूर्व भागात द्राक्ष व भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.यंदा उशिरा का होईना चांगला पाऊस झाल्याने सर्व खरिपाची पिके जोमदार होती मात्र ऐन काढणीच्या वेळी आलेल्या पावसाने पिकांची शेतातच नासाडी झाली आहे. भात, नागली, सोयाबीन पीक शेतात आडवे होत त्यावर पाणी साचून पिकांना कोंब फुटले आहेत. द्राक्ष छाटणीचा हंगाम सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होतो. त्यानंतर सातत्याने पडणाऱ्या पावसाने द्राक्ष फुटीवर परिणाम होत घड जिरण्याचे प्रमाण वाढत उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत असतानाच विविध बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावणे शेतकरी त्रस्त आहेत. दररोज महागडे औषधें फवारणी करीत पीक वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. द्राक्ष बागांमध्ये गाळात फवारणीचे ट्रॅक्टर अडकण्याचे प्रकार वाढत ट्रॅक्टरचेही मोठे नुकसान झाले आहे. तरीही शेतकऱ्यांनी पीक वाचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु गेल्या आठवड्यात रात्रभर झालेल्या पावसाने अनेक द्राक्षबागांमध्ये घडकुज मनीगळ होत अतोनात नुकसान झाले आहे. लाखो रु पये खर्च होऊन डोळ्यासमोर झालेले नुकसान बघून शेतकरी हताश झाले आहेत. टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, कोथंबीर आदी भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले असून उत्पादन कमालीचे घटले आहे.