सप्तशृंगी गडाकडे भाविकांनी फिरवली पाठ
By Admin | Updated: August 29, 2015 22:47 IST2015-08-29T22:46:52+5:302015-08-29T22:47:46+5:30
सप्तशृंगी गडाकडे भाविकांनी फिरवली पाठ

सप्तशृंगी गडाकडे भाविकांनी फिरवली पाठ
पांडाणे : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर गाजावाजा करून मंदिर प्रशासनाने सर्वस्तरावर तयारी केली होती. परंतु भाविकांनी पाठ फिरवल्याने गडावर शुकशुकाट जाणवत होता. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन सुविधांचे नियोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी २४ तास मंदिर खुले, मोफत आरोग्य व निवास सुविधा, नांदुरीपासून गडापर्यंत खासगी वाहनांना बंदी, प्रसाद सुविधा, परिसर स्वच्छता, पोलीस बंदोबस्त अशा सुविधा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे या मार्गाने जाणारे भाविक तर सोडाच; मात्र परिसरातील भाविकांनी गडाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत होते. शनिवारी पौर्णिमा व सुटीचा दिवस असतानाही संख्येत घट झाल्याचे दिसून आले. दुरवरून येणारे भाविक स्वत:च्या वाहनातून गडावर नेहमी येतात; मात्र नांदुरीपासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना प्रवेश नाकारल्याने त्याचा फटका बसला. पौर्णिमेला किमान पन्नास हजार भाविकांची हजेरी दिवसभर गडावर असते; मात्र गडावर शुकशुकाट जाणवल्याने कुंभ पर्वणीची पौर्णिमा गडावरील घटकांना फलदायी झाली नसल्याचे दिसून आले.