सलग दुसऱ्या दिवशी हजारावर बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:19+5:302021-03-13T04:26:19+5:30
नाशिक : कोरोनाचा प्रकोप सलग दुसऱ्या दिवशीही कायम असताना जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) तब्बल १,१४० नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने ...

सलग दुसऱ्या दिवशी हजारावर बाधित
नाशिक : कोरोनाचा प्रकोप सलग दुसऱ्या दिवशीही कायम असताना जिल्ह्यात गुरुवारी (दि. ११) तब्बल १,१४० नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणादेखील हादरून गेली आहे. दरम्यान, नाशिक शहरात १ तर ग्रामीणमधून २ असे एकूण ३ बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या २,१५८ वर पोहोचली आहे.
बुधवारी बाधितांचा आकडा तेराशे पल्याड जाऊन १,३३० पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी १,१४० इतक्या मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाल्याने नागरिकांमध्येदेखील चिंतेचे सावट पसरले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सलग दोन दिवस यापूर्वी केवळ ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यातच बाधित आढळले होते. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख २९ हजार ५७७ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख २१ हजार ७११ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात सध्या ५,७०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९३.९३ वर आली आहे. त्यात नाशिक शहरात ९३.७१, नाशिक ग्रामीण ९५.२१, मालेगाव शहरात ८९.१८, तर जिल्हाबाह्य ९२.३६ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या ५ लाख ६९ हजार ७०१ असून, त्यातील ४ लाख ३७ हजार ३६० रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख २९ हजार ५७७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर २,८२४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.
इन्फो
बरे होण्याच्या टक्केवारीत मोठी घट
महानगरातील उपचारार्थी रुग्णांची संख्या ५,७०८ पर्यंत पोहोचली आहे. उपचारार्थी संख्येने ५ हजारांचा टप्पा गाठण्यास गतवर्षी सप्टेंबर महिना उजाडला होता. त्यानंतर बरोबर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येने ६ हजारांच्या टप्प्याकडे आगेकूच केली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याची सरासरी ९८ टक्क्यांवरून ९४ टक्क्यांपेक्षा खाली आली आहे. अवघ्या महिनाभरात रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत तब्बल ४ टक्के घसरण झाली आहे.
इन्फो
विलंबित अहवाल तीन हजारांजवळ
कोरोना संशयितांचे अद्यापही तीन हजारांच्या आसपास प्रलंबित अहवाल बाकी आहेत. बुधवारपर्यंत पाच हजारांहून अधिक चाचण्यांचे अहवाल औरंगाबादच्या प्रयोगशाळेत प्रलंबित हाेते. ते अहवाल मिळण्यास प्रारंभ झाल्याने बाधितांच्या संख्येत आठवडाभराच्या तुलनेत मोठी वाढ झाली असून, अद्यापही प्रलंबित अहवालांची संख्या ३ हजारांजवळ आहे.