ज्यांच्या विरोधात उपोषण ‘त्यांच्या’च हस्ते सरबत प्राशन
By Admin | Updated: July 23, 2015 00:44 IST2015-07-23T00:44:23+5:302015-07-23T00:44:38+5:30
जिल्हा रुग्णालय : कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची सांगता

ज्यांच्या विरोधात उपोषण ‘त्यांच्या’च हस्ते सरबत प्राशन
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी व महिला कर्मचारी संघटनेच्या काही सदस्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप करून उपोषण सुरू केले होते़ मात्र त्याच जिल्हा शल्य चिकित्सकांच्या हस्ते सरबत प्राशन करून आंदोलकांना आपल्या उपोषणाची सांगता करावी लागल्याचे चित्र बुधवारी बघावयास मिळाले़ या आंदोलनाच्या समाप्तीनंतर येथील कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चेचे फडही रंगल्याचे दिसून आले़
चांगली सेवा मिळणे हा रुग्णांचा हक्क असून, त्यासाठी नेमलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले काम व्यवस्थितरीत्या करणे हे कर्तव्य आहे़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांविरोधात एकसारखी आंदोलने, निवेदने दिले जात असल्याचे दिसून येते़ कर्मचाऱ्यांना अन्यायाबाबत दाद मागण्याचा अधिकार आहे, मात्र आंदोलकांच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली जात आहे़
रुग्णालयातील सर्व यंत्रणांनी आपले काम सुव्यवस्थितपणे पार पाडावे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना काही विशेष अधिकार आहेत़ या अधिकाराचा उपयोग त्यांनी प्रशासनात सुसूत्रता व रुग्णांच्या सोयींसाठी करायलाच हवा, याबाबत दुमत असल्याचे कारण नाही़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी संघटना व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते तयार झाले आहे़
दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारपासून राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व रणरागिणी महिला मंचने आमरण उपोषण सुरू केले होते़ या उपोषणाबाबत माजी मंत्री शोभाताई बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर यांच्या मध्यस्थीने उपोषणार्थी उज्ज्वला कराड, छाया निकम, मीना मारू यांच्यासह सहकाऱ्यांना बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांच्या हस्ते सरबत देऊन सांगता झाली़