शेतकऱ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: January 13, 2016 22:47 IST2016-01-13T22:28:10+5:302016-01-13T22:47:28+5:30
विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग साडेतीन तास ठप्प : हरणबारी डाव्या कालव्याचे काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी

शेतकऱ्यांचा ठिय्या
सटाणा : अनेक वर्षांपासून प्रलंबित हरणबारी डाव्या कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी लाभक्षेत्रातील असंख्य महिला, पुरु ष शेतकऱ्यांनी आज दुसऱ्यांदा मांगीतुंगी फाट्यावर साडेतीन तास ठिय्या दिला. यामुळे विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती. मात्र सर्वांनीच या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने आंदोलकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस यंत्रणेने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलनकर्त्यांनी नमते घेत नाशिक येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देत आंदोलन मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. त्यानंतर रोखून धरलेल्या राज्यमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मांगीतुंगी येथील सोहळ्यासाठी पंतप्रधान येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता या भागातील शेतकऱ्यांनी साखळी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून बुधवारी स. १० वाजेपासून विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील मांगीतुंगी फाट्यावर शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. मात्र, साडेतीन तास उलटूनही एकही अधिकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे गेला नाही. आंदोलनात शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन, प्रदीप कांकरिया, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, प्रवीण पवार, भाऊसाहेब अहिरे, जगदीश पवार, आबा बच्छाव, पंकज भामरे, नितीन भामरे, केवळ भामरे, सुनंदा पवार, यांच्यासह लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.(वार्ताहर)