आली फाईल माघारी, मग पोलिसांच्या दरबारी!
By Admin | Updated: May 9, 2017 02:48 IST2017-05-09T02:48:16+5:302017-05-09T02:48:24+5:30
नाशिक : सामान्यत: एखादी वस्तू चोरीस गेली की, तिचे ‘मूल्य’ आणि ‘महत्त्व’ ओळखून सामान्य नागरिक थेट पोलीस ठाण्यात धाव घेतो...

आली फाईल माघारी, मग पोलिसांच्या दरबारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सामान्यत: एखादी वस्तू चोरीस गेली की, तिचे ‘मूल्य’ आणि ‘महत्त्व’ ओळखून सामान्य नागरिक थेट पोलीस ठाण्यात धाव घेतो... पोलिसांनी कितीही हाकलले तरी तक्रार घ्या यासाठी आर्जव करतो... परंतु नाशिकच्या एमआयडीसीची बातच न्यारी... एखादी फाईल गहाळ झाली म्हणून लगेचच थोडी धावपळ करायची, फाईलच ती त्यात वादग्रस्तही, मग पाय फुटणारच... येईल की परत... त्यासाठी काय एवढी घाई. अखेरीस याच श्रद्धा आणि सबुरीला यश आलेच आणि पाय फुटलेली फाईल आली परत अन् तीही कोणाच्या आधाराशिवाय... पण आता म्हणे सारेच जागृत झाले आणि मिळालेले दस्तावेज आधी कोणी चोरून नेले याचा शोध घेण्यासाठी पोलीस दरबारी धावपळ सुरू झाली.
सरकारी मानसिकता दर्शवणारी ही घटना एमआयडीसीतील आहे. हा विभाग विकासकामांपेक्षा वादंगातच दंग असतो. त्यातच एक वाद मध्यंतरी झडला आणि त्याच्याशी संबंधित एक फाईल किंबहुना त्यातील महत्त्वाची १९२ पाने गहाळ झाली. आता त्याचे एमआयडीसीला तसे फार महत्त्व वाटले नाही. चालतयं की.. असे म्हणत त्याकडे खरे तर दुर्लक्षच झाले. परंतु ही सारी शांतता सहन न होणाऱ्यांनी बभ्रा केला. तरीही अंमळ सारेच शांतच होते. बहुधा ‘तू गेली असशील तेथून परत ये, तुला कोणी रागावणार नाही’ अशी वृत्तपत्रीय जाहिरात देण्याचाच संबंधितांचा इरादा होता, परंतु अधिक चर्चा नको म्हणून तो बेत रहीत केला असावा. अखेरीस संबंधित फाईलीलाच एमआयडीसीची दया आली आणि गेल्या पावली परत आली. कोणासही काही न सांगता फाईल गेली तसेच कोणासही काही न सांगता आणि आवाज न करता परत येऊन एमआयडीसीतील एका सोफ्यावर निवांत पहुडली. कोणा कर्मचाऱ्याची सोफ्यावरील ‘पाकिट’ पाहून उत्सुकता चाळवली आणि त्यात बघतो तर काय, गेलेली इभ्रतच जणू परत आली. सर्वत्र आनंदी आनंद झाला.
फाईल सापडली ना, आता सारे निश्चिंत, आता चोर शोधायला हरकत नाही, असा यथावकाश विचार एमआयडीसीने केला आणि मग पोलीस ठाणे गाठले. गेल्यावर्षी १३ आॅगस्ट रोजी गहाळ झालेली फाईल की ज्यात मौल्यवान कागद नाहीत, परंतु ७१ लाख रुपयांची रक्कम नमूद आहे, अशी कागदपत्रे गहाळ होती, ती २ मेस परत आली. परंतु ज्याने कोणी तिला फूस लावली त्याचा आता शोध घ्यावा असे पत्र दिले. पोलीस बुचकळ्यात पडले. जीवित माणूस बेपत्ता झाला तरी लवकर गुन्हा नोंदवण्याची ज्यांची परंपरा नाही तेथे निर्जीव कागदांचे काय.. पण सरकारी काम म्हणून त्यांना गुन्हा दाखल करावा लागला. फाईल गहाळ ते मुद्देमाल स्वत:हून हजर या कालावधीत तब्बल ‘सहा’ महिन्यांचे कालहरण झाले आणि सरकारी काम अन् ‘सहा’ महिने थांब या एमआयडीसीच्या वृत्तीचे स्मरण झाले.