सिन्नर : समाजातील समजूतदार व्यक्तींनी सामंजस्याची भूमिका ठेवली तरच सोशल मीडियातील समाजकंटकांवर चाप बसेल, असे मत अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सिन्नर येथे व्यक्त केले.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशन आणि मुसळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला कमिटीची बैठक येथील तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते. व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, नगरसेवक नामदेव लोंढे, रामाभाऊ लोणारे आदी उपस्थित होते. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात अनेकवेळा समाजकंटकांना स्थान मिळाल्याने त्या कार्यक्रमांना गालबोट लागते. तेव्हा समाजातील समजूतदार व्यक्तींनी सामंजस्याची भूमिका घेणे आवश्यक असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.बैठकीत बकरी ईदच्या दिवशी सर्व ठिकाणी सकाळी ९ वाजता धार्मिक प्रार्थनेचे पठण व्हावे, पावसाचा व्यत्यय आल्यास मस्जिदीमध्ये प्रार्थना करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी ८. ३० ते १० ऐवजी ८ वाजेपासूनच पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली. तसेच धार्मिक स्थळांपासून २०० मीटरपर्यंत वाहतूक बंदीचा निर्णय घेण्यात आला.सिन्नर तालुक्यात जातीय सलोखा उत्तम असल्याने बकरी ईद उत्साहात आणि निर्विघ्न होण्याचा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मुस्लीम बांधव तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आवश्यक अपेक्षांची विचारणा करण्यात आली. तसेच सण, उत्सवाची सादरीकरणाची माहिती जाणून घेण्यात आली.
समाजकंटकांवर अंकुश असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:45 IST
समाजातील समजूतदार व्यक्तींनी सामंजस्याची भूमिका ठेवली तरच सोशल मीडियातील समाजकंटकांवर चाप बसेल, असे मत अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी सिन्नर येथे व्यक्त केले.
समाजकंटकांवर अंकुश असावा
ठळक मुद्देविशाल गायकवाड : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक