शिक्षणाधिकारी नसल्याने माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:19+5:302021-08-22T04:18:19+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. ...

शिक्षणाधिकारी नसल्याने माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन रखडले
नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना अटक झाल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या अटकेचा फटका नाशिक जिल्ह्यातील जवळपास १८ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसला असून, त्यांचे जुलै महिन्याचे वेतन रखडल्याने या शिक्षकांच्या रक्षाबंधन सणावरही आर्थिक अडचणींचे सावट निर्माण झाले आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार डॉ. वैशाली झनकर यांच्या अटकेनंतर अजूनही इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १८ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी ही अटक केली असून, त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. परंतु, अद्याप त्यांच्या जागेवर कोणालाही पदभार सोपविण्यात आला नसल्याने शिक्षकांची वेतन देयकांवर शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी होऊ शकलेली नाही. त्यामुळे कोषागार अधिकाऱ्यांनी ही देयके स्वीकारलेली नसल्याने शिक्षकांचे वेतन रखडले आहे. दरम्यान, शिक्षकांच्या वेतनाची समस्या सोडविण्यासाठी प्रभारी शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार पुष्पा पाटील यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने घेतला असून, त्या सोमवारी पदभार स्वीकारणार असून, त्यानंतरच शिक्षकांच्या जुलै महिन्याच्या वेतनातील अडसर दूर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शिक्षकांच्या रक्षाबंधनावर सावट
शिक्षण विभागाच्या या दिरंगाईच्या कारभारामुळे नाशिक जिल्ह्यातील १८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. या परिणाम शिक्षकांच्या कर्ज हप्त्यांवर झाला आहे. शिक्षकांच्या दरमाह पगारातून चालू महिन्यात जाणारा हप्ता थकल्याचे शिक्षकांकडून सांगितले जात आहे.