पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
By Admin | Updated: April 30, 2017 01:18 IST2017-04-30T01:18:35+5:302017-04-30T01:18:48+5:30
मालेगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही.

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
मालेगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नामांकन अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केला नाही. निवडणूक निर्णय अधिकारी शनिवारी दिवसभर कार्यालयात तळ ठोकून होते. इच्छुक उमेदवारांनी केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधून संगणकीय नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती घेतली.
महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी २९ एप्रिल ते ६ मेपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस कोरडा गेला. दरम्यान, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जगताप यांनी सातही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कार्यालयासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात आल्या. काही उमेदवारांनी आॅनलाइन सात अर्ज दाखल केले आहेत. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अधिकृतरीत्या सादर केले नसल्यामुळे नामांकन अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारांना बॅँकेत खाते उघडण्यासाठी पॅनकार्डची सक्ती करण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्रासोबत केंद्रानिहाय प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीचा अनुक्रमांक टाकणे आवश्यक आहे. तसेच निवडणूक चिन्हाची मागणी करताना तक्त्यामधील चिन्हाची मागणी नोंदवणे गरजेचे आहे. पक्षाचा एबी फार्म शेवटच्या दिवशी ३ वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. तसेच छाननीपूर्वी अर्जातील त्रुटी उमेदवाला दूर करता येणार आहे. नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयीच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मनपाच्या मुख्य कार्यालयात हेल्प बेस सेंटर उभारण्यात आले आहे. अर्ज दाखल करताना प्रत्येक उमेदवारासोबत केवळ चारच समर्थकांना प्रवेश दिला जात आहे. प्रभागातील प्रत्येक जागेसाठी उमेदवाराला स्वतंत्ररीत्या अनामत रक्कम भरावी लागणार आहे. येत्या १० व १७ मे रोजी निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. (वार्ताहर)