मुंबई नाक्यावर सिग्नल यंत्रणा नसल्याने हाल
By Suyog.joshi | Updated: April 13, 2024 14:22 IST2024-04-13T14:21:54+5:302024-04-13T14:22:46+5:30
महापालिकेने मुंबई नाक्याच्या सर्कलचा घेर कमी केल्यानंतर रस्ते प्राधिकरण विभागाने उड्डाणपुलाखाली द्वारकेकडे जाणारा रस्ता तयार केला.

मुंबई नाक्यावर सिग्नल यंत्रणा नसल्याने हाल
नाशिक (सुयोग जोशी) : महापालिकेने मुंबई नाक्याच्या सर्कलचा घेर कमी केल्यानंतर रस्ते प्राधिकरण विभागाने उड्डाणपुलाखाली द्वारकेकडे जाणारा रस्ता तयार केला असला तरी सिग्नल यंत्रणाच नसल्याने सिडकाे, शहरातून तसेच तिकडून द्वारकासह भाभानगरकडून येणारी वाहने कोणत्याही मार्गाने मध्येच घुसत असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे. सिडकोकडून येणारी वाहने द्वारकेकडे जात असताना मध्येच कुठेतरी वळण घेत असल्याने अनेकवेळा किरकोळ अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. द्वारका चौकात सहा बाजूने वर्दळ असल्याने तेथे असलेल्या सिग्नलच्या धरतीवर मुंबई नाका येथे सिग्नल बसविण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. एकूण पाच सिग्नल मुंबई नाका येथे बसविले जाणार आहेत.
द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प होत असल्याने या भागात सर्व्हिस रोडसह राष्ट्रीय महामार्गावरदेखील सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. एका सिग्नलचा कालावधी जवळपास दोन मिनिटे असल्याने वाहनधारकांना सिग्नलवरून गाडी बाहेर काढताना विलंब होत असला तरी वाहतुकीचे नियोजन मात्र व्यवस्थित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबई नाका सर्कलवरही सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असली तरी ती कधी बसवणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
असे राहतील सिग्नल-
द्वारका भागातून मुंबई नाक्याकडे येताना पहिला सिग्नल राहील. हा सिग्नल सुटल्यानंतर सर्व्हिस रस्त्यावरील सिग्नलही सुटेल. दुसरा सिग्नल मुंबई नाक्याकडून द्वारका भागाकडे येणारा असेल. तिसरा सिग्नल हा भाभानगर बाजूने राहील. मुंबई नाका मार्गे हा सिग्नल राहील. चौथा सिग्नल हॉटेल साहेबांसमोर राहील, तर पाचवा सिग्नल अतिरिक्त म्हणून ठेवला जाणार आहे.