नाशिक : शहरात भटक्या श्वानांची संख्या शेकडोने असतानाच दुसरीकडे चांगल्या जातीचे श्वान पालणाचा छंद वाढत चालला आहे. असे असले तरी महापालिकेत फक्त दीड हजार पाळीव श्वानांचीच नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात भटक्या श्वानांची संख्या नेमकी किती हे गुलदस्त्यात आहे.शहरात भटक्या श्वानांची समस्या हा वादाचा विषय आहे. भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी गेल्या सुमारे दहा वर्षांपासून महापालिकेच्या वतीने निर्बीजीकरणाची प्रक्रिया राबवली जाते. विल्होळी येथे त्यासाठी खास केंद्र उभारण्यात आले आहे. शहराच्या विविध भागातून श्वान पकडून खास व्हॅनमधून विल्होळी केंद्रावर आणली जातात आणि तेथे निर्बीजीकरणाची प्रक्रिया राबविली जाते. त्यानंतर श्वान ज्या ठिकाणहून पकडून आणले त्याच ठिकाणी पुन्हा सोडले जात असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात शस्त्रक्रियेनंतरचे श्वान पांडवलेणी परिसरात सोडले जात असल्याचा आरोप अनेकदा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केले आहेत. मात्र त्यानंतरदेखील फरक पडलेला नाही. नाशिक महापालिकेच्या वतीने एकीकडे निर्बीजीकरण प्रभावशाली पद्धतीने राबविल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र भटक्या श्वानांची वाढती संख्या बघता नेहमीच त्याविषयी नागरिक आणि विशेष करून नगरसेवक शंका व्यक्त करीत असतात. त्यावर श्वानांच्या प्रजनन क्षमतेपुढे महापालिकेला मर्यादा पडतात, असे सांगितले जाते.दरम्यान, महापालिकेच्या वतीने शहरात पाळीव श्वानांची नोंदणी आवश्यक करण्यात आली असून, वार्षिक नोंदणी शुल्क घेऊन ती केली जाते. त्याचप्रमाणे श्वानांना लसीकरण झाल्याची नोंददेखील करण्यात येत असते. शहरात अलीकडील काळात चांगल्या जातीचे श्वान पाळण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून, मालक बाहेरगावी गेला तर श्वानांना सांभाळणाऱ्या हॉस्टेलपासून त्यांना आज्ञेचे पालन करणे, संशयास्पद वस्तूचा शोध घेणे यांसारखे प्रशिक्षण देणारे वर्गदेखील सुरू झाले आहेत. तथापि, पाळीव श्वानांच्या नोंदणीबाबत नागरिक उदासीन आहेत. सध्या फक्त दीड हजार पाळीव श्वानांची नोंद महापालिकेकडे आहे. विशेष म्हणजे महापालिकेचे पथक एखाद्या भागात भटके श्वान पकडण्यासाठी गेल्यास नागरिक ते पाळीव सांगून सहानुभूती दाखवतात. परंतु प्रत्यक्षात ते पाळीव असल्याची कोणतीही नोंद केली जात नाही.गणना कधी?शहरातील भटक्या श्वानांसंदर्भात नागरिक ओरड करतात. तर मनपा निर्बीजीकरण सफल होत असल्याचा दावा करते. यासंदर्भात अनेकदा श्वानांची गणना करण्याची मागणी करण्यात आली आहे. शहरात वृक्षगणना होत असेल तर श्वान गणना का होऊ शकत नाही काय? असा जाणकारांचा प्रश्न आहे. परंतु महापालिका मात्र टाळाटाळ करीत असल्याची जाणकारांची तक्रार आहे.
शहर परिसरात असंख्य भटके श्वान, मनपात फक्त दीड हजाराचीच नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:57 IST