...तर रुग्णसेवेला आयुर्वेदाची संजीवनी

By Admin | Updated: June 3, 2014 23:15 IST2014-06-03T23:09:45+5:302014-06-03T23:15:54+5:30

नाशिक : आयुर्वेद डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्याची परवानगी देणारा अध्यादेश असला तरीही अनेक मर्यादा आणि काही प्रमाणात अनिश्चितता आहेच.

... then Sanjivani of Ayurveda in the patient's life | ...तर रुग्णसेवेला आयुर्वेदाची संजीवनी

...तर रुग्णसेवेला आयुर्वेदाची संजीवनी

 

नाशिक : आयुर्वेद डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी प्रॅक्टीस करण्याची परवानगी देणारा अध्यादेश असला आणि त्यानुसार आयुर्वेदाचे डॉक्टर्स अ‍ॅलोपॅथीची सेवा देत असले, तरीही अनेक मर्यादा आणि काही प्रमाणात अनिश्चितता आहेच. आयुर्वेदाच्या डॉक्टरांवर कायमच कायद्याची टांगती तलवार आणि आक्षेप येण्याची भीती असल्याने अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठीचा लढा तीव्र करण्यात आला आहे. आयुर्वेदाच्या डॉक्टरांना येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन राज्यभरातील आयुर्वेद डॉक्टरांचे संघटन झालेले आहे. त्यांनी ‘अस्तित्व परिषद’ नावाचे संघटनही केले आहे. नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रथम या डॉक्टरांना साथ दिली आणि त्यांच्या प्रश्नाला चालना दिली. त्यानंतर सातत्याने राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू झाले. अलीकडच्या काळात विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावित यांनी या प्रकरणाला चालना दिल्याने कॅबिनेटमध्ये अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यास मंजुरी दिल्याने आता केवळ कायदा तयार होण्याचे सोपस्कार राहिले आहेत. असा कायदा अस्तित्वात आणि आयुर्वेद डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण मिळाले तर ८० हजार आयुर्वेद पदवीधर आणि सुमारे दहा हजार पदव्युत्तर डॉक्टर्स प्रतिष्ठेने आपला व्यवसाय करू शकणार आहेत. राज्यातील खेडोपाडी, दुर्गम भागात आजही आयुर्वेद डॉक्टर्स रुग्णसेवा सांभाळत आहेत. आयुर्वेद एम.एस. डॉक्टर्स असूनही कित्येकदा शस्त्रक्रियेसाठी अशा रुग्णांना शहरात पाठविले जाते. कायद्याचे संरक्षण मिळाल्यास एम.एस. डॉक्टर्स शस्त्रक्रिया करून रुग्णांना तत्काळ सेवा मिळू शकते. त्यांना त्यासाठी शहरात पाठविण्याची आणि वेळ वाया घालविण्याचा धोका पत्करण्याची गरजही पडणार नाही. पदव्युत्तर शिक्षण घेऊनही आजही अनेक डॉक्टरांची ग्रामीण रुग्णालयातील पदे भरली जात नाहीत. त्यामुळे तेथील रुग्णांना सेवा मिळत नाही. आयुर्वेदाचे डॉक्टर्स उपलब्ध झाल्यास रुग्णसेवेला चालना मिळून चांगल्या आरोग्याच्या संधी मिळू शकतील. खरे तर पदव्युत्तर डॉक्टर्स हे ओपीडीपासून ते अतिदक्षता विभागापर्यंतच्या सेवा आजही देत आहेत; परंतु त्यांना कायद्याचे संरक्षण मिळालेले नाही. तसे झाल्यास आयुर्वेदाकडे पाहण्याचा इतर पॅथींचा दृष्टिकोन बदलू शकेल. या सर्व बाबींसाठी राज्यातील डॉक्टर एकत्र आले आहेत. यासाठी डॉ. संदीप कोतवाल, डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. मंदार रानडे, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. असित अरगडे, डॉ. अभिजित आग्रे, डॉ. गुरू गणपत्ये, डॉ. मुश्ताक मुकादम, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. सुधाकर मोहिते आदिंचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: ... then Sanjivani of Ayurveda in the patient's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.