‘त्यांच्या’ अंगणात उजळल्या ‘हंडाभर चांदण्या’
By Admin | Updated: August 18, 2016 01:22 IST2016-08-18T01:17:13+5:302016-08-18T01:22:49+5:30
जलाभियान : आदिवासी भागातील तीन गावे पाणीटंचाईमुक्त

‘त्यांच्या’ अंगणात उजळल्या ‘हंडाभर चांदण्या’
जलाभियान : आदिवासी भागातील तीन गावे पाणीटंचाईमुक्तनाशिक : आदिवासी भागातील शेवखंडी, फणसपाडा आणि खोटरेपाडा ही अतिदुर्गम गावे. अनेक किलोमीटर पायपीट केल्यानंतर तेथील माउलींच्या हंड्यात पाणी जमा व्हायचे, परंतु एक दिवस त्यांच्या अंगणातच पाणी येऊन पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव तरळले. पाणीटंचाईने होरपळून निघालेल्या गावाचीच व्यथा मांडणाऱ्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाच्या प्रयोगांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या निधीतून सोशल नेटवर्किंग फोरमने हे जलाभियान हाती घेतले आणि तीनही गावे शंभर टक्के पाणीटंचाईमुक्त करत एक आदर्श समाजापुढे ठेवला.
नाशिकचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांच्या प्रतिभाशाली लेखणीतून आणि सचिन शिंदे यांच्या कल्पक दिग्दर्शनातून ‘हंडाभर चांदण्या’ हे दोन अंकी नाटक उभे राहिले. वर्षानुवर्षे पाण्याची वाट पाहत अगतिक झालेल्या गावाच्या विदारक परिस्थितीवर बेतलेले हे नाटक भीषण दुष्काळाची दाहकताही अधोरेखित करते. गेल्या काही महिन्यांत पाणीटंचाईने अवघा महाराष्ट्र अस्वस्थ बनलेला असताना नेमक्या काळात ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाची संहिता समोर आली आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून निरनिराळे सामाजिक अभियान राबविणारे प्रमोद गायकवाड यांनी सदरचा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी निर्माता म्हणून भूमिका निभावली. राज्यस्तरीय व्यावसायिक नाट्य निर्माता संघाच्या वतीने आयोजित स्पर्धेत नाटकाने विक्रमी पारितोषिके पटकावली आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावला त्याचवेळी नाटकावर पसंतीची मोहोर उमटली गेली. त्यामुळे निर्मात्यासह लेखक व दिग्दर्शकाचा उत्साह दुणावला आणि सदर नाटकाचा विषय पाहता ‘हंडाभर चांदण्या’चे प्रयोग महाराष्ट्रभर करत दुष्काळग्रस्त गावांसाठी प्रत्यक्ष मदतनिधी उभारता येईल काय, असा विचार पुढे आला. ग्रामीण आणि आदिवासी भागांना पिण्याचे पाणी उपलब्ध
करून देणाऱ्या सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमाच्या जलाभियानासाठी नाटकाचे प्रयोग लावण्यात आले.