बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 02:00 IST2022-05-16T01:58:40+5:302022-05-16T02:00:57+5:30
बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी तीन महिन्यांमध्ये सखोल तपास करत सबळ पुरावे गोळा केले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुराव्यानिशी सखोल दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लवकरच सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल
नाशिक : बहुचर्चित डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांडप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी तीन महिन्यांमध्ये सखोल तपास करत सबळ पुरावे गोळा केले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुराव्यानिशी सखोल दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लवकरच सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मनपाच्या सिडको येथील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येचा त्यांचा पती संशयित संदीप वाजे याने मावसभाऊ यशवंत म्हस्के याच्या मदतीने थंड डोक्याने कट रचला होता, असे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांकडून वाजे व म्हस्के यांना बेड्या ठोकण्यात आल्या. या दोघांनी मिळून अत्यंत नियोजनबद्ध व सराईत गुन्हेगारांप्रमाणे सुवर्णा वाजे यांचा काटा काढला. त्यांना पार्टीसाठी शहराबाहेर बोलावून घेत वाडीवऱ्हे शिवारातील रायगडनगर येथे महामार्गालगत त्यांची हत्या करून मोटारीसह जिवंत पेटवून दिले होते. घटनास्थळावरून पूर्णपणे जळालेल्या मोटारीवरून पोलिसांनी माग काढत संशयित संदीप वाजे भोवती फास आवळला. संदीप वाजे याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नी सुवर्णा ही बेपत्ता झाल्याची फिर्याद देखील अंबड पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
जळालेल्या मोटारीत सापडलेल्या हाडांवरून पोलिसांनी डीएनए चाचणीद्वारे पडताळणी करत ती हाडे सुवर्णा वाजे यांचीच असून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आणले. दरम्यान, वाजे याच्या मोटारीतून मोठा सुरादेखील पोलिसांनी जप्त केला होता. या चाकूचा वापर सुवर्णा वाजे यांचा खून करण्यासाठी केला गेला असावा, असा पोलिसांचा दावा आहे.
दरम्यान, पोलिसांनी या हत्याकांडाचा सखोल तपास करत विविध पुराव्यांची शृखंला तयार करून न्यायालयापुढे दोषारोप पत्रासह ठेवली आहे. सबळ पुराव्यांमुळे या गुन्ह्यातील संशयित वाजे, म्हस्के यांना कठोर शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
---