भाजप-शिंदेसेना एकत्र आल्यास युती मजबूत; शंभर प्लसचा नारा कायम, पण स्वबळाचे नारे थांबले
By संजय पाठक | Updated: December 19, 2025 11:33 IST2025-12-19T11:32:28+5:302025-12-19T11:33:07+5:30
उद्धवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाव्य युती मोडीत काढण्यासाठी नवी युक्ती, अजित पवार गट दूरच, काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गटाची अस्तित्वाची लढाई ठरणार, छोट्या पक्षांना आघाडीचाच राहणार आधार

भाजप-शिंदेसेना एकत्र आल्यास युती मजबूत; शंभर प्लसचा नारा कायम, पण स्वबळाचे नारे थांबले
संजय पाठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक: महापालिकेच्या इतिहासात प्रथमच गेल्या निवडणुकीत भाजपला १२२ पैकी ६६ जागांवर यश मिळाले आणि पूर्ण बहुमत मिळाले. त्यामुळे एकंदरच भाजप स्वबळावर निवडणुकीच्या मुडमध्ये होती. महाविकास आघाडी एकसंध होण्याची चिन्हेही नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर वातावरण बदलले आहे. स्वबळाची भाषा भाजप आणि शिंदेसेनेलाही परवडण्यासारखी नसल्याने आता पुन्हा या दोन पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास युती बळकट होणार आहे.
यंदा भाजपकडे सक्षम उमेदवारांची फळी असली, तरी तीच उणे बाजू पण आहे. पराभूत उमेदवार हे शिंदेसेना किंवा अन्य पक्षांना जाऊन मिळू शकतात. त्यातच महाविकास आघाडी व मनसेचे गणित विस्कटले असले तरी मनसे एकत्र येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मनसे आणि उद्धवसेनेला उमेदवार देखील मिळू नये, यासाठी भाजप-शिंदेसेना एकत्र येण्याची शक्यता आहे.
एकूण प्रभाग किती आहेत? ३१
एकूण सदस्य संख्या किती? १२२
तीन वर्षांची प्रशासकीय राजवट संपणार
मनपाच्या निवडणुका २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारमधील घोळ, पक्षातील फाटाफूट आणि प्रभाग रचना तसेच ओबीसी आरक्षण गोंधळाने तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. या कालावधीत सात प्रशासक झाले आहेत. प्रशासकीय राजवटीत मूलभूत समस्याही न सुटल्याने सध्या नागरिक त्रस्त झाले आहेत.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप - ६६
शिवसेना - ३५
राष्ट्रवादी काँग्रेस - ६
काँग्रेस - ६
मनसे - ५
अपक्ष - ३
रिपाइं ए - १
आता काय आहेत राजकीय समीकरणे?
नाशिकमध्ये भाजप सर्वाधिक सक्षम आहे. या पक्षाकडे १२२ जागांसाठी १ हजार इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत. शिंदेसेनेकडे ५०० अर्ज दाखल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे इच्छुकांची संख्या कमी आहे. त्यामुळे ठरवल्यास महायुती होऊ शकेल आणि त्याच दृष्टीने पावले पडत आहेत.
महाविकास आघाडीत सध्या तरी मनसे आणि उद्धवसेना अधिक जवळ आहे. त्या तुलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद जेमतेम आहे. याशिवाय त्यांच्यासमवेत माकप आणि रिपाईसारख्या अन्य पक्षांना ते समवेत घेऊ शकतील.
कोणते मुद्दे ठरतील निर्णायक?
खड्डेयुक्त रस्ते, संपूर्ण शहरात पाणीपुरवठा विस्कळीत असणे आणि सर्वात महत्त्वाचा वाहतूक कोंडीचा विषय आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत असून, सर्वत्र वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
गुन्हेगारीचा विळखा वाढत आहे. पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला मोहिमेत अनेक राजकीय नेते आणि माजी नगरसेवकांवर कारवाई केली असली, तरी उमेदवारी वाटपात अशा गुन्हेगारांना तिकिटे दिल्यास हा देखील मुद्दा आहे.
कुंभमेळ्याच्या कामांना मुळातच विलंबाने सुरूवात होत आहे. त्यात अनेक कामांच्या दर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप आहे. कुंभमेळ्यानिमित्ताने तपोवनातील १८०० झाडे तोडण्याचा मुद्दा वादात आहेत.
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती?
एकूण - १०,७३,४०८
पुरुष - ५,७०,६९९
महिला - ५,०२,६३७
आता एकूण किती मतदार?
एकूण - १३,६०,७२२
पुरुष - ७०३९६८
महिला - ६५६६७५
इतर - ७९
वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला होणार?
२०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार, नाशिक शहराची लोकसंख्या १३ लाख ८४ इतकी आहे. २०१२ आणि २०१७मध्ये याच लोकसंख्येवर आधारित निवडणूक झाली होती. मात्र, आता १३ लाख ६० हजार ७२२ मतदार आहेत.
यात महिलांचा वाटा जवळपास ४५% इतका आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला होण्याची शक्यता आहे. युवकांची साथ भाजप आणि मनसेला अजूनही आहे. त्याचाही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.