जिल्हा रुग्णालयाबाहेर थाटले ‘मिनी बसस्थानक’
By Admin | Updated: September 13, 2015 23:07 IST2015-09-13T23:06:21+5:302015-09-13T23:07:08+5:30
जिल्हा रुग्णालयाबाहेर थाटले ‘मिनी बसस्थानक’

जिल्हा रुग्णालयाबाहेर थाटले ‘मिनी बसस्थानक’
नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होत असलेल्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे काही प्रमाणात का होईना निर्बंध शिथील केल्याने शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांची ने-आण करत असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. ठक्कर बझार, इदगाह मैदान तसेच मेळा बस स्थानक परिसरात बसेसला थांबा देण्यात आला होता. त्र्यंबक नाका पासून पुढे शहरात जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने अनेक बसचालकांनी जिल्हा रुग्णालयासमोर बस थांबवल्याने काहीकाळ
‘मिनी बस स्टॅण्ड’चे स्वरूप निर्माण झाले.
इदगाह मैदान आणि ठक्कर बझार, मेळा बसस्थानकाकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग असल्याने या परिसरात बसेसची गर्दी बघायला मिळाली. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या बसेस तसेच त्र्यंबकेश्वर, धुळे, पुणे आदिं ठिकाणाहूनदेखील बस याच ठिकाणी येत असल्याने या भागात छोटेखानी बसस्थानक असल्याचा भास झाला.
शहरातून ठिकठिकाणाहून रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात येत असल्याने तसेच पायी चालणारे भाविकदेखील याच भागातून मार्गक्रमण करत असल्याने याठिकाणी गर्दी बघायला मिळाली. बस हळूहळू पुढे जात असल्याने अनेक बस प्रवाशांनी नियोजित थांब्या आधीच उतरणे पसंत केल्याने बस पुढे नेता येत नसल्याचे चालकांनी सांगितले. प्रशासनाने गर्दीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पहिल्या पर्वणीत कडक नियोजन केले होते, सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर प्रशासनाने बंदोबस्त शिथील केला असला तरी भाविकांनी नियमांचे पालन करून अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. (प्रतिनिधी)