थॅलेसेमियाग्रस्त मुलांचा गौरव
By Admin | Updated: May 10, 2017 00:38 IST2017-05-10T00:37:32+5:302017-05-10T00:38:11+5:30
नाशिक : अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने पाचव्या वर्धापनदिनी थॅलेसेमिया पीडित मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

थॅलेसेमियाग्रस्त मुलांचा गौरव
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : थॅलेसेमिया पीडित रुग्णांना मोफत रक्तसंक्रमणाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीने पाचव्या वर्धापनदिनी थॅलेसेमिया पीडित मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘थॅलेसेमिया डे’ निमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पीडित मुलांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. थॅलेसेमिया पीडित रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्तसंक्रमणाची गरज भासते. मात्र, ऐन उन्हाळ्यात रक्ताची टंचाई भासत असल्याने अर्पण रक्तपेढी आणि इनरव्हील क्लब आॅफ जनरेशन नेक्स्ट यांच्या वतीने ‘समर चॅलेंज-२०१७’चे आयोजन सिटी सेंटर मॉलमध्ये करण्यात आले आहे. त्यानिमित्त ‘थॅलेसेमिया डे’ साजरा करण्यात येऊन मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थॅलेसेमिया आजाराविषयी जागृती करणारा लघुपट दाखविण्यात आला. तसेच पीडित मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. प्रमुख अतिथींना थॅलेसेमिया पीडित मुलांनी बनविलेले दिवे व थॅँक्स कार्ड भेट म्हणून देण्यात आले. आजाराशी सामना करत शैक्षणिक क्षेत्रात नैपुण्य मिळविणाऱ्या मुलांचा गौरव करण्यात आला. पालक व मुलांनी ‘उंच भरारी उज्ज्वलतेची’ ही नाटिका सादर केली. डॉ. पलोड यांनी थॅलेसेमिया मुलांची मोफत दंतचिकित्सेची जबाबदारी घेतली. वर्षा उगावकर यांनी थॅलेसेमिया सोसायटीची माहिती दिली. यावेळी झालेल्या शिबिरात १०० रक्तपिशव्या संकलित झाल्या. सूत्रसंचालन भाग्यश्री पवार यांनी केले. यावेळी ब्रह्मा व्हॅलीचे सी. के. पाटील, स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या सुजाता कायदे, इनरव्हील क्लबच्या डॉ. मीनल पलोड, नंदिनी रामचंद्रानी, रोटरीच्या सौ. वेणूगोपाल यांच्यासह डॉ. शशिकांत पाटील, डॉ. स्नेहल पाटील आदि उपस्थित होते.