दारणाकाठावर पुन्हा बिबट्यांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:17+5:302021-02-05T05:38:17+5:30
लॉकडाऊनकाळात बिबट्यांच्या दहशतीने दारणाकाठ थरारला होता. या भागात बिबट्यांचा मुक्त संचार अन् मानवी हल्ल्यांनी स्थानिक रहिवाशांसह वनविभागाचीही झोप उडविली ...

दारणाकाठावर पुन्हा बिबट्यांची दहशत
लॉकडाऊनकाळात बिबट्यांच्या दहशतीने दारणाकाठ थरारला होता. या भागात बिबट्यांचा मुक्त संचार अन् मानवी हल्ल्यांनी स्थानिक रहिवाशांसह वनविभागाचीही झोप उडविली होती. सुमारे डझनभर बिबटे दारणा काठालगतच्या नाशिक तालुक्यातील विविध गावांमधून जेरबंद करण्यात आले होते.
दरम्यान, शिलापूर, जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव, एकलहरे, बेलतगव्हाण, शेवगेदारणा, संसारी, दोनवाडे, लॅमरोड, वडनेर, या परिसरात बिबट्यांचा वावर पुन्हा वाढत असल्याच्या तक्रारी वनविभागाला प्राप्त होऊ लागल्या आहे. बिबट्याकडून पशुधनाची हानी करण्यात आल्याच्याही घटना घडल्याने नागरिकांकडून या भागात पिंजरे लावून वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. ऊसतोडीचा हंगाम असल्यामुळे बिबट्यांची सुरक्षित आश्रयास जागा संपुष्टात येऊ लागली आहे. त्यामुळे लपण आणि भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना बिबटे परिसरातील शेतकरी, शेतमजुरांना नजरेस पडत असल्याने बिबट-मानव संघर्षाला निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
---इन्फो---
पंधरवड्यात अशी झाली पशुधनाची हानी
चाडेगाव, सामनगावामध्ये वासरांवर बिबट्याने हल्ला करुन ठार केले. त्यानंतर पळसे गावात गाय, वासरु आणि शेळीवर बिबट्याने सलग तीन दिवसांत हल्ला चढविला. त्यानंतर
बेलतगव्हाणमध्येही एक शेळी आणि वासराची बिबट्याने शिकार केली. वडनेर रोड परिसरातही बिबट्याने शेळी फस्त केल्याची तक्रार वनविभागाकडे आहे.
---इन्फो--
गाळप हंगाम अन् ऊस शेती संपुष्टात
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस शेती गाळप हंगामामुळे संपुष्टात आली आहे. यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी कमी झाल्याने बिबटे उघड्यावर नागरिकांच्या नजरेस पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर रात्री उशिरापर्यंत बिबट्यांचे दर्शन या भागातील मळे परिसरात होते असे नागरिकांचे म्हणणे आहे.
--इन्फो--
गेल्या महिन्यात तीन बिबटे जेरबंद
जानेवारी महिन्यात ९ तारखेला पाथर्डी शिवारातील डेमसे मळ्यात बिबट्या जेरबंद झाला तर १४ तारखेला गांधीनगरच्या कॅट्समध्ये एक बिबट्या आणि ३१ जानेवारी रोजी तिसरा बिबट्या सामनगावात पिंजऱ्यात अडकला.
-----------
०२फॉरेस्ट नावाने फोटो आर वर सेव्ह आहे.
बिबट्याचा फाईल फोटो वापरावा