हरसूलमध्ये तणाव कायम

By Admin | Updated: July 16, 2015 00:16 IST2015-07-16T00:14:59+5:302015-07-16T00:16:36+5:30

२५ पोलीस जखमी : ३२ संशयित ताब्यात

Tension prevailed in Harsul | हरसूलमध्ये तणाव कायम

हरसूलमध्ये तणाव कायम

हरसूल : मंगळवारी पोलिसांच्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पेटलेली हरसूलमधील दंगल, जाळपोळ, लुटालूट बुधवारी दुपारपर्यंत सुरू होती़ दुपारनंतर घटनास्थळी दाखल झालेले खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी मध्यस्थी केल्याने तणाव थोड्या प्रमाणात
निवळला आहे़ दरम्यान, पोलिसांनी पकडलेल्या महाविद्यालयीन तरुणांना सोडून देण्याच्या मागणीमुळे तणाव वाढण्याची शक्यता असून, हरसूलमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे़ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी जादा कुमक मागवून कडक बंदोबस्त तैनात केला आहे़
हरसूल गावाजवळील बारीपाडा येथील शेख इरफान अख्तर यांच्या विहिरीत भागीरथ तुळशीराम चौधरी (वय २०) या तरुणाचा मंगळवारी (दि़ ७) मृतदेह आढळून आला होता़ याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अकस्मात मृत्यूची तसेच शवविच्छेदन अहवालाबाबत आक्षेप घेत सखोल चौकशी व संशयितांच्या अटकेसाठी मंगळवारी हरसूलमधून मोर्चा काढण्यात आला होता़ या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी केलेला लाठीमार व गोळीबारात रामदास गंगाराम बुदर (वय २६, मु़ वाजवड, पो़ नाचलोंढी, ता़ पेठ, जि़ नाशिक) हा तरुण ठार झाला़, तर याउलट मोर्चेकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत तीन अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते़
दंगलखोरांनी हरसूलमधील प्रमुख बाजारपेठेतील घरे, दुकाने, पोलीस वाहने व पोलीस चौकीला लक्ष्य केल्यामुळे दोन दिवसांत ४९ दुकाने व १४ घरांचे नुकसान होऊन मोठी लूट करण्यात आली आहे़ आजूबाजूच्या खेड्यातील तसेच गुजरात सीमेवर आदिवासी बांधवांनी लुटीच्या उद्देशाने बुधवारी सकाळी पुन्हा हरसूलच्या प्रमुख बाजारपेठेवर चाल केली़ पोलीस व दंगलखोर यांच्या धुमश्चक्रीत पुन्हा जाळपोळ व दुकानांतील मालाची लूट करण्यात आली़ दुपारी तीन वाजेपर्यंत हा पाठशिवणीचा खेळ सुरू होता़ दंगलखोरांच्या दगडफेकीत सुमारे चार अधिकाऱ्यांसह सुमारे २५ कर्मचारी जखमी झाले आहेत़ पोलिसांनी आतापर्यंत ३२ दंगलखोरांना ताब्यात घेतले आहे़
दुपारी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे हरसूलला पोहोचल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या खेड्यातील शांतता समितीचे सदस्य, गावातील प्रमुख लोकांसमवेत बैठका घेतल्यानंतर हरसूलमधील तणाव निवळला़ घटनास्थळी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, विशेष पोलीस महानिरीक्षक जयजित सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले, प्रांत बाळासाहेब वाक्चौरे हजर होते़ सायंकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हरसूलला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेऊन शांततेचे आवाहन केले़ दरम्यान, हरसूलची परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बळ मागविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Tension prevailed in Harsul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.