कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देवळा नगरपंचायतीने मार्च २०२० पासून देवळा येथे दर रविवारी कोलती नदीपात्रात भरणारा आठवडे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला. ह्या व्यावसायिकांचे आठवडाभराचे आर्थिक नियोजन या बाजारावर अवलंबून होते. तसेच किराणा, भाजीपाला आदींसह इतर खरेदी करण्यासाठी मजूर व शेतकरी वर्ग या आठवडे बाजारावरच अवलंबून राहत होते. कारण रविवारीच मजूरांना आठवडाभर केलेल्या कामाचे पैसे देण्याची प्रथा तालुक्यात अनेक वर्षांपासून सुरु आहे. यामुळे सर्व जण रविवारची प्रतिक्षा करायचे. हा आठवडे बाजार बंद झाल्यानंतर रविवारी होणारी लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.शनिवारी आपल्या शेतातून काढून ठेवलेला भाजीपाला रविवारी आठवडे बाजारात विकावयाची प्रथा बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांनी यातून मार्ग काढत आपल्या गावातील चौकात छोटा बाजार भरवून भाजीपाला विक्रीची दुकाने थाटली. ग्राहकांचाही यास चांगला प्रतिसाद मिळाला. आता येत्या रविवारपासून सुरु होणाऱ्या आठवडे बाजारात विक्रेत्यांनी व ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिग, मास्क, हातांची स्वच्छता आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी केले आहे.
देवळ्यातील आठवडे बाजार रविवारपासून पुन्हा गजबजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 16:49 IST