काळाराम मंदिराचे बदलणार रूपडे

By Admin | Updated: August 18, 2016 00:50 IST2016-08-18T00:48:07+5:302016-08-18T00:50:14+5:30

नवे रूप : लेझर शो, कारंजे, चित्र प्रदर्शनातून मांडणार इतिहास

The temple of Kalaram temple will transform | काळाराम मंदिराचे बदलणार रूपडे

काळाराम मंदिराचे बदलणार रूपडे

 नाशिक : सुमारे तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकच्या श्री काळाराम मंदिराचे रूप आता बदलणार आहे. लेझर शो, कारंजे आणि प्रभू रामचंद्रांचा जीवनपट मांडणारे चित्र प्रदर्शन या माध्यमातून काळाराम मंदिर परिसर अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. बाळासाहेब सानप यांनी आमदार निधीतून पाच कोटी रुपयांची मदत दिली असून त्यामुळे हा बदल करण्यात येणार आहे.
नाशिक म्हटले की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी म्हणून गौरवाने उल्लेख होतो. काळाराम मंदिराच्या माध्यमातूनही हेच स्मरण होत असते. या मंदिराला पुरातत्त्व खात्याच्या माध्यमातून बऱ्यापैकी जतन करण्यात आले आहे. देशभरातून पर्यटक आणि भाविक मंदिरात येत असतात. काळानुरूप आता या मंदिर परिसराला आणखीच आकर्षक करण्याचा विश्वस्त मंडळाचा प्रयत्न होता. त्यासाठी आमदार निधीचे पाठबळ मिळाल्याने नव्या योजना साकारण्याची तयारी झाली असून पर्यटनमंत्री राम शिंदे यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली. त्यानुसार आता पूर्व दरवाजासमोरील प्लाझा अंतर्गत रामबागेपासून ते पूर्व दरवाजापर्यंत नेवासा येथील दगडाचे फ्लोरिंग बनविणे तसेच उद्यानातील रेलिंग व संरक्षक भिंत काढून लॅण्डस्केपिंग करण्यात येणार आहे. बुधवारी यासंदर्भात झालेल्या बैठकीत आराखड्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच आमदार सानप यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पांडुरंग बोडके, गिरीश पुजारी, मंडलेश्वर काळे, अ‍ॅड. अजय निकम, मंदार जानोरकर, वैभव पुजारी, डॉ. एकनाथ कुलकर्णी, अ‍ॅड. ओमप्रकाश लोयार, धनंजय पुजारी व अतुल वडगावकर यांनी त्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The temple of Kalaram temple will transform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.