मालेगावचे तापमान चाळीशी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:50+5:302021-05-08T04:13:50+5:30
---------------------------------- विवाद सुनावण्या तहकूब मालेगाव : येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल आर. टी. एस. अपील अर्ज व ग्रामपंचायत ...

मालेगावचे तापमान चाळीशी पार
----------------------------------
विवाद सुनावण्या तहकूब
मालेगाव : येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल आर. टी. एस. अपील अर्ज व ग्रामपंचायत विवाद प्रकरणांवरील एप्रिल महिन्यातील सुनावण्या साथरोग प्रतिबंधात्मक उपाय योजनांन्वये तहकुब करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली आहे. तहकुब करण्यात आलेल्या सुनावण्यांचा पुढील दिनांक संबंधित पक्षकार, वकील यांना या कार्यालयामार्फत नोटीसव्दारे कळविण्यात येईल, असे अपर जिल्हाधिकारी निकम यांनी सांगितले.
--------------------------
कांदा साठवणुकीवर भर
मालेगाव : यंदा कसमादे परिसरात कांद्याचे समाधानकारक उत्पादन झाले आहे. ग्रामीण भागात सध्या कांदा काढणीला वेग आला असून, मजूर टंचाईची समस्या भेडसावत आहे. शेतकऱ्यांनी घरच्या घरी कांदे काढून चाळीत कांदा साठवणुकीवर भर दिला आहे. बाजारपेठेत कांद्याला भाव नसल्याने शेतकरी कांदा चाळीत साठवत आहेत.
----------------------
पांढरे पट्टे मारण्याची मागणी
मालेगाव : शहरालगतच्या टेहरे चंदनपुरी, मुंगसे शिवारातील महामार्गाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. महामार्गावर डांबराचा थर टाकण्यात आला असून, पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. वाहनधारकांना नेमकी दिशा कळत नाही. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. टोल वसूल करणाऱ्या कंपनीने तातडीने महामार्गावर पांढरे पट्टे व दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
---------------------------------------
चंदनपुरीतील गर्दी ओसरली
मालेगाव : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र चंदनपुरी येथील श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी ओसरली आहे. कोरोनामुळे राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. मंदिरही बंद करण्यात आले आहे. केवळ पुजाऱ्यांकडून दररोजची पूजा केली जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यातील भाविक श्री खंडोबा महाराजांच्या दर्शनाला येत असतात. मात्र, कोरोनामुळे चंदनपुरीत शुकशुकाट आहे. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल मंदावली आहे.