सांगा, आम्ही शिकायचं कसं?

By Admin | Updated: September 26, 2014 23:59 IST2014-09-26T23:58:40+5:302014-09-26T23:59:03+5:30

सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर : विद्यार्थिनींचा संतप्त सवाल

Tell me, how do we learn? | सांगा, आम्ही शिकायचं कसं?

सांगा, आम्ही शिकायचं कसं?

विंचूर : प्रसंग पहिला : येथील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर भरवस फाट्यावरून घराकडे जात असते. कोपरगावकडे जाणारा ट्रक युवतीजवळ थांबतो. काही कळण्याच्या आत तिला वाहनात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. समयसुचकता दाखवत युवतीने आरडाओरड केल्यामुळे ट्रकचालक वाहनासह पलायन करतो.
प्रसंग दुसरा : अल्पवयीन मुलगी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना मोटारसायकलस्वार तिला रस्त्यात अडवतो. मुलीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, मुलीच्या किंचाळण्याने मजूर, शेतकरी धाव घेतात. हुल्लडबाजी करणाऱ्या युवकाला जमावाकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले जाते.
प्रसंग तिसरा : सायंकाळी साडेपाचला शाळा सुटल्यानंतर बसने प्रवास करणारे विद्यार्थी तिनपाटीवर बसची वाट पाहत थांबतात. बसचालक मुलांना मागून बस येत आहे, या बसमध्ये पास चालत नाही असे सांगून प्रवेश नाकारतात. कित्येक वेळ वाट पाहून बस येत नसल्याचे बघून उशीर झाल्याने काही विद्यार्थी मोटारसायकलस्वारास हात देऊन थांबविण्यासाठी विनंती करीत असल्याचे चित्र दिसून येते.
एस.टी. महामंडळाचे अडवणुकीचे धोरण, विद्यालयाच्या आवाराबाहेर हुल्लडबाजी करणारे टोळके व रस्त्यावरील असुरक्षितता यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून, ‘आम्ही शाळेत जायचं का नाही’, असा सवाल उपस्थित केला आहे. एकही मुलं शाळाबाह्य राहू नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. कर्मवीर विद्यालयाच्या संकुलात उत्तम शिक्षण मिळत असले तरीही शाळाबाह्य असुविधांमुळे पालकांंमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यालयात सुमारे २५००च्या वर विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विद्यार्थीसंख्या मोठी असल्याने शालेय प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असली तरीही शाळेच्या बाहेर कंपाउंडजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या टोळक्यांना आवर घालता आलेला नाही. टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी प्रशासनाने संबंधित विभागाला अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. विंचूर मध्यवर्ती गाव असल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. बरीचशी मुले बसनेच प्रवास करतात. तथापि, अनेक वेळा बसमध्ये प्रवेश मिळत नसल्याने त्यांचे हाल होत असतात. येवला आगारातील अनेक बसवाहक विद्यार्थ्यांना टाळण्यासाठी नाशिकऐवजी औरंगाबाद अशी पाटी लावत असल्याचा आरोप पालकवर्गाकडून केला जात आहे.

Web Title: Tell me, how do we learn?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.