तहसीलदारांच्या बदल्यांचेही निघणार आदेश?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 01:51 IST2022-06-27T01:51:07+5:302022-06-27T01:51:28+5:30
राज्याच्या राजकारणातील अस्थिरता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आदेशाचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे देखील आदेश निघणार असल्याची चर्चा महसूल कर्मचारी वर्तुळात सुरू आहे.

तहसीलदारांच्या बदल्यांचेही निघणार आदेश?
नाशिक: राज्याच्या राजकारणातील अस्थिरता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या आदेशाचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश निघाल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदल्यांचे देखील आदेश निघणार असल्याची चर्चा महसूल कर्मचारी वर्तुळात सुरू आहे. साधारणपणे मे महिना हा महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम असतो. त्यामुळे इच्छित ठिकाणी बदली मिळावी यासाठी फिल्डींग लावली जाते. त्यानुसार यंदाही अधिकाऱ्यांनी तयारी केलेली असताना लांबलेल्या बदल्यांमुळे अधिकारीही धास्तावले होते. कोरोनामुळे आगोदरच बदल्या रखडल्याने यंदा बदल्यांची सर्वांनाच प्रतीक्षा होती. जुलै महिन्यात बदल्या होण्याचे जवळपास निश्चित झालेले होते.
परंतु राज्यातील अस्थिर राजकीय वातावरणामुळे जूनच्या अखेरच्या आठवड्यातच बदलीसत्र सुरू झालेले आहे. केवळ महसूल विभागच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांच्या माेठ्या प्रमाणात बदल्यांचे आदेश निघालेले आहेत. त्या खालोखाल महसूल विभागातील बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या बदल्यांच्या आदेशानंतर आता निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या बदल्यांचे आदेश काढले जाणार असल्याची चर्चा आहे. नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचे देखील आदेश याच बदल्यांच्या आदेशाबरोबर काढले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्य सरकार अडचणीत आल्यामुळे पुढील काही दिवसात राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. परंतु विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील होऊ घातलेल्या बदल्यांची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. त्याअनुषंगाने आता वर्ग ‘अ’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे ‘गणित’ जुळविण्यासाठी आदेश काढण्याच्या हालाचाली सुरू झालेल्या आहेत. त्यामध्ये काही बदल तातडीने केले जात आहेत तर काही नव्याने नावे समाविष्ट केले जाऊ शकतात अशी चर्चा देखील जोरदारपणे सुरू आहे.