शिक्षक पुरस्कारावरून खडाजंगी
By Admin | Updated: September 2, 2015 22:37 IST2015-09-02T22:37:16+5:302015-09-02T22:37:50+5:30
शिक्षण समिती सभा : आदर्श शिक्षकांनाच द्यावे पुरस्कार

शिक्षक पुरस्कारावरून खडाजंगी
नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार निवडताना शिक्षण समितीला कोणत्याही प्रकारची माहिती न देताच परस्पर प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्यावरून शिक्षण समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांनी शिक्षण विभागाला धारेवर धरले.
शिक्षण व आरोग्य सभापती किरण थोरे यांच्या उपस्थितीत शिक्षण समितीची मासिक बैठक बुधवारी (दि. २) झाली. बैठकीच्या सुरुवातीला २७६ शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करण्याबाबत तसेच १९६ शाळा सुरू करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली, असे सदस्यांनी बैठकीत सांगितले. सांगली, सातारा जिल्ह्यांत पुस्तकविरहित शिक्षण देणाऱ्या प्राथमिक शाळांना भेटी देण्यासाठी शिक्षकांचे दोन गट जाऊन आले. या शाळांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाचा आवश्यक तो दर्जा राखण्यात यावा, अशी सूचना सदस्यांनी केली. पुरस्कार निवडीवरून सभेत सदस्य प्रा. अशोक जाधव व चंद्रकांत वाघ यांनी शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना चांगलेच धारेवर धरले. आदर्श शिक्षक निवडताना जो शिक्षक खरोखरच आदर्श आहे अशा शिक्षकांनाच हे पुरस्कार दिले पाहिजे. त्यासाठी पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे शिक्षण समितीच्या सदस्यांना अवलोकनार्थ कळविली म्हणजे शिक्षकांच्या निवडीबाबत शंका राहणार नाही. विभागीय आयुक्तांकडे सरसकट ३२ प्रस्ताव कसे पाठविले याची विचारणा बैठकीत सदस्यांनी मोगल यांना केली.
बैठकीत शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी १५० मुख्याध्यापकांची पदोन्नती होणार असून त्याबाबत गुरुवारी प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. जे पदोन्नती नाकारतात, त्यांना पुन्हा पदोन्नती देण्यात येऊ नये,अशी सूचना सदस्यांनी बैठकीत केली. सुट्ट्यांमध्ये शिक्षक प्रशिक्षण व शाळा दुरुस्तीची कामे करावीत,असेही काही सदस्यांनी सूचविले. शाळा दुरुस्तीची कामे मंजूर करताना मुख्याध्यापकांकडून संबंधित शाळेचे फोटो मागवून त्या शाळेची दुरुस्ती करण्यात यावी,असे स्पष्ट केले. माधुरी बोरसे व चंद्रकांत वाघ यांनी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबाबत विचारणा केली. तर प्रा. प्रवीण गायकवाड यांनी ग्रामसेवकांप्रमाणेच मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी प्रत्येकी एक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी दत्तक घ्यावे,अशी सूचना केली.(प्रतिनिधी)