अशैक्षणिक कामातच दबले शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:02+5:302021-02-05T05:41:02+5:30
अशैक्षणिक कामांसाठी विशेषकरून जिल्हा परिषद, महापालिकेच्या शिक्षकांना जुंपले जात असून, काम करण्यास नकार दिल्यास शासकीय सेवा अटी, शर्तींचा भंग ...

अशैक्षणिक कामातच दबले शिक्षक
अशैक्षणिक कामांसाठी विशेषकरून जिल्हा परिषद, महापालिकेच्या शिक्षकांना जुंपले जात असून, काम करण्यास नकार दिल्यास शासकीय सेवा अटी, शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची धमकीही दिली जात आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, यासाठी शिक्षक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करीत आहेत. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली. शासनाकडून आश्वासन देण्यापलिकडे काहीही केले जात नाही. शिक्षकांना बीएलओचे (केंद्रस्तरीय अधिकारी) काम तर वर्षानुवर्षे करावे लागत आहे. मतदार यादीचे काम झाले तर मतदार नोंदणी, त्यानंतर ओळखपत्र वाटप, मतदार यादी अद्ययावतीकरण संपल्यानंतर मात्र निवडणुकीच्या कामासाठीही शिक्षकांनाच पुढे केले जाते. त्यामुळे महिनोनमहिने शिक्षक या कामांमध्ये गुंतून पडत असल्यामुळे त्यांचे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे. परंतु त्यांच्या गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांच्याही उपस्थितीवर परिणाम होत आहे. कधी कधी याच अशैक्षणिक कामांमुळे नैराश्य येऊन शिक्षकांकडूनच शाळांना दांडी मारण्याचे काम केले जाते.
--------
शासकीय योजनांचे ओझे
* शिक्षकांना मतदार यादीचे काम कायमच दिले जाते. त्यात मतदार नोंदणी, छायाचित्रे गोळा करणे, यादी दुरूस्त करणे, मतदान चिठ्या वाटप करणे, मतदान प्रक्रिया पार पाडणे.
* ग्रामपंचायतीच्या योजनांसाठी सर्वेक्षण करणे, घरकुल योजनांसाठी लाभार्थी शोधणे, शौचालयांची माहिती संकलित करणे.
* आरोग्य विभागासाठी सर्वेक्षण करणे, कोरोना काळात तपासणी नाक्यावर संशयित रुग्णांचा शोध घेणे, माझे कुटुंब, माझी जबाबदारी उपक्रम राबविणे, घरोघरी जाऊन सिरो सर्वेक्षण करणे.
------
शाळा सांभाळून करतात कामे
शिक्षकांच्या प्रामाणिकपणावर शासनाचा विश्वास असून, त्याचमुळे त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाते. शिक्षकांनी सदरची अशैक्षणिक कामे शाळा आटोपल्यानंतर करायची असतात. त्यासाठी त्यांना मोबदलाही दिला जातो.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी
------------
एक शिक्षकी शाळांचे नुकसान
शासनाच्या अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांची निवड करताना कोणतीही परिस्थिती लक्षात घेतली जात नाही. बऱ्याच वेळा एक शिक्षकी शाळेतील शिक्षकांना काम सोपविले जाते. जिल्ह्यात ५५ शाळा एक शिक्षकी आहेत. अशा शाळांमध्ये विद्यादान व अशैक्षणिक कामे करताना शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले जाते.
--------
विद्यार्थ्यांची संख्या -२,६७,७९४
शिक्षकांची संख्या- ११,६५५
शाळांची संख्या- ३,२६६