अध्यापनापेक्षा इतर कामांचाच शिक्षकांवर अधिक भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:22+5:302021-02-05T05:44:22+5:30
नाशिक : जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांवर शैैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा अन्य कामांचेच ओझे अधिक आहे. त्याचा परिणाम ...

अध्यापनापेक्षा इतर कामांचाच शिक्षकांवर अधिक भार
नाशिक : जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांवर शैैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा अन्य कामांचेच ओझे अधिक आहे. त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असल्याने खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढण्याच्या दिशेने त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे केवळ शिक्षण आणि अध्यापनावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित करून अन्य कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केल्यास शिक्षणाची गुणवत्ता आणखी सुधारण्यास मदत होईल, असा सूर शिक्षक संंघटनांमधून उमटत आहे.
राष्ट्रीय पातळीवर जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांनी स्वीकारली आहेत. मात्र, त्याशिवाय बांधकाम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे, अनेक वेळा मतदार पुनर्निरीक्षण, बीएलओ या कामांना शिक्षकांचा विरोध असताना शिक्षकांना त्या कामात जुंपले जाते. या कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, अध्ययन अध्यापनावर परिणाम होतो. मूळ ज्या कामासाठी नियुक्ती आहे, तेच काम जर योग्य पद्धतीने करता येत नसेल तर त्याचा विचार शासनाने करायला हवा. शिक्षकांना काही कामासाठी मानधन मिळते. ते मानधन सुशिक्षित बेरोजगारांना देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेतल्यास त्यांनाही लाभ होईल आणि कामाचा बोझाही शिक्षकांवर येणार नाही. अन्यथा त्यासाठी पर्यायी व्यवस्था शासनाने निर्माण करायला पाहिजे, असे शिक्षक संघटनांचे मत आहे.
एक शिक्षकी शाळांचे हाल
जिल्ह्यातील आदिवासी भागात कमी पटाच्या शाळांमध्ये एकच शिक्षक आहे. त्यातच शिक्षकेतर पदे भरण्यावरील बंदी आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांवर सर्वच वर्गांची जबाबदारी येत असून, दोन शिक्षकी शाळांचीही मोठी संख्या असल्याने एक शिक्षक, शिक्षकेतर कामात अडकून असतो. तेथील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.
शासकीय योजनांचा भार
- शिक्षकांना मतदार यादी, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्व्हे, विविध जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामासाठीच एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.
- पोषण आहार, धान्य वाटप आणि त्यासोबत त्याच्या विविध प्रकारामध्ये नोंदी ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या-औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमात शिक्षक केंद्रस्थानी असतो.
- कोरोना काळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला.
अध्यापनाव्यतिरिक्त विविध प्रकारचे कामे
शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त विविध प्रकारची अनेक कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको.
आनंदा कांदाळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती
शिक्षक शासकीय कर्मचारी आहे. अन्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच निवडणूक जनगनणा यासारखी राष्ट्रीय कार्यक्रमाची कामे शिक्षकांना आहेत. अन्य विभागाचे कर्मचारीही हे काम करतात. त्याव्यतिरिक्त कोणतेही अशैक्षक काम शिक्षकांना नाही.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक
पॉईंटर
१,६७४ जिल्हा परिषदेच्या शाळा
१३,५०० जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या
२,७६,८१३ जि.प. शाळा विद्यार्थी संख्या