शिक्षिकागृह बनले शिवणकाम केंद्र?
By Admin | Updated: July 24, 2015 00:25 IST2015-07-24T00:07:32+5:302015-07-24T00:25:13+5:30
वजीरखेडे येथील प्रकार : ग्रामस्थांचा आरोप

शिक्षिकागृह बनले शिवणकाम केंद्र?
नाशिक : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेले व मालेगाव पंचायत समितीच्या ताब्यात असलेल्या शिक्षिकागृहाचा वापर सद्यस्थितीत एक शिंपी शिवणकाम दुकानासाठी करीत असल्याचा आरोप वजीरखेडे येथील ग्रामस्थांनी केला असून, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
जिल्हा परिषदेची वजीरखेडे येथील शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात आहे. तसेच शाळेलगतच असलेले शिक्षिकागृह हे आधी एकटी शिक्षिका किंवा शिक्षक जोडप्यास राहण्यासाठी दिले जात होते. त्यापोटी शिक्षकांच्या वेतनातून या इमारतीचे भाडे कपात करण्यात येत होते. मुख्याध्यापक बदलले की सदर पद्धत बदलत असे. गेल्या पाच ते दहा वर्षांपासून हे शिक्षिकागृह बंदस्थितीत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या शिक्षिकागृहाचा वापर एक खासगी शिंपी त्याच्या शिवणकाम केंद्रासाठी करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. विशेष म्हणजे गट शिक्षणाधिकाऱ्यालासुद्धा माहीत नसेल की हे शिक्षिकागृह जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे. त्यामुळे या शिक्षिकागृहाचा वापर करणाऱ्या संबंधित दुकानदाराकडून भाडे आकारणी करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी वजीरखेडे येथील ग्रामस्थांनी केली आहे. हे शिक्षिकागृह पूर्वीप्रमाणेच मुख्याध्यापकांच्या ताब्यात देऊन त्याचा भाडेतत्त्वावर वापर करून मालेगाव पंचायत समितीचा महसूल वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(प्रतिनिधी)