ताडपत्री, प्लास्टिक कापडाची मागणी वाढली

By Admin | Updated: June 5, 2016 22:15 IST2016-06-05T22:12:20+5:302016-06-05T22:15:04+5:30

मान्सूनचे वेध : ग्रीन मॅट, कार कव्हर अधिक मागणी; आकर्षक रंगातील छत्र्यांचे आकर्षण

Tarapati, the demand for plastic cloth increased | ताडपत्री, प्लास्टिक कापडाची मागणी वाढली

ताडपत्री, प्लास्टिक कापडाची मागणी वाढली

 नाशिक : अंदमानात वेळेवर दाखल झालेला पाऊस केरळपासून संथ प्रवास करणार असला तरी येत्या पंधरवड्यात मान्सून महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता असल्याने जोरदार पावसापासून घराचे व शेतमालाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या ताडपत्रीला मागणी वाढली आहे. शहरातील बाजारपेठांसह कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानांमध्ये पाणकापड, ताडपत्री खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ग्राहकांकडून रेनकोट, छत्री, पावसाळी चप्पल बूट आदि दैनंदिन गरजेच्या वस्तूंचीही मोठी खरेदी होत आहे.
शहरातील बाजारपेठांमध्ये ताडपत्री खरेदीदारांची संख्या वाढली आहे. पावसाच्या आगमनापूर्वी शहरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी ताडपत्री व प्लास्टिकचे कापड खरेदी करून घराचे छत व जनावरांच्या गोठ्यांचे छत दुरुस्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे प्लास्टिक कापडाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांकडूनही खरेदीदारांना हव्या त्या आकारामध्ये ताडपत्री व प्लास्टिक कागदाची मागणी पूर्ण केली केली जात आहे, तर काही शेतकरी औद्योगिक वसाहतींमधून ताडपत्री आणि प्लास्टिकच्या कापडाची खरेदी करीत आहे. शेतकरीवर्गाकडून काळ्या प्लास्टिकला अधिक मागणी असून इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी ताडपत्री किंवा प्लास्टिक कापड खरेदी करीत आहेत. दोन प्रकारात उपलब्ध असलेल्या लॅमिनेशन रोल व लॅमिनेशन ताडपत्रीची किंमत ३५ रुपये मीटरपासून ते ५० रुपये मीटरपर्यंत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tarapati, the demand for plastic cloth increased