तपोवनचा शाही मार्ग वाहतुकीसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:07 IST2018-01-28T23:31:33+5:302018-01-29T00:07:38+5:30
धोकादायक झालेला गोदावरी नदीवरील जुना कन्नमवार पूल तोडण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे गोदावरी ते तपोवनाला जोडणारा नवा शाही मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे; मात्र भाविक पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक अद्याप तपोवन किंवा गोदाकाठच्या दिशेने लावण्यात आला नसल्यामुळे गैरसोय होत आहे.

तपोवनचा शाही मार्ग वाहतुकीसाठी बंद
नाशिक : धोकादायक झालेला गोदावरी नदीवरील जुना कन्नमवार पूल तोडण्याची कार्यवाही सुरू असल्यामुळे गोदावरी ते तपोवनाला जोडणारा नवा शाही मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे; मात्र भाविक पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचना फलक अद्याप तपोवन किंवा गोदाकाठच्या दिशेने लावण्यात आला नसल्यामुळे गैरसोय होत आहे. गोदाकाठ-पंचवटी ते तपोवनमध्ये ये-जा करण्यासाठी नवीन शाही मार्ग हा सोयीस्कर ठरतो. या मार्गावरून भाविक पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात मार्गस्थ होत होती. मात्र कन्नमवार पूल तोडण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू असल्यामुळे या पुलापासून पुढे शाही मार्ग ओलांडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकामाच्या डेब्रीजचा ढिगारा पडला आहे. सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारे दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाही. तसेच गोदाकाठावरील गौरी पटांगण येथे शाही मार्गाच्या प्रारंभीदेखील पुढे तपोवनाच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे, असा फलक लावला गेला नसल्यामुळे पर्यटकांची वाहने कन्नमवार पुलापर्यंत येऊन पुन्हा माघारी फिरत आहेत किंवा डाव्या बाजूला वळण घेऊन महामार्गाने पुढे तपोवनात चौफुलीवरून मार्गस्थ होत आहे; मात्र प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी फलक उभारण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. कारण बाहेरगावाहून येणाºया पर्यटकांची यामुळे दिशाभूल होत असून, पर्यायी मार्गासाठी शोधाशोध करावी लागत आहे.
डावे वळण अरुंद : मोठ्या वाहनांना अडथळा
गोदाकाठ-रामकुंडापासून आल्यानंतर तपोवनात जाण्यासाठी डावे वळण घेताना मोठ्या बसेसला अडथळा निर्माण होत आहे. कारण सदर वळण अरुंद असून माती, दगडांचा या वळणालगत ढीग पडलेला दिसतो. त्यामुळे वळण रुंद करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे तपोवनातून रामकुंड-पंचवटीकडे येतानादेखील नागरिकांची गैरसोय होत आहे. पर्यटक नेहमीप्रमाणे कन्नमवार पुलापर्यंत आल्यानंतर रस्ता बंद असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात येते. त्यामुळे तपोवनातदेखील शाही मार्गाच्या प्रारंभी रस्ता पुढे वाहतुकीसाठी बंद असल्याचा सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.