‘समृद्धी’च्या पर्यायी मार्गाची चर्चाच
By Admin | Updated: April 30, 2017 02:26 IST2017-04-30T02:26:05+5:302017-04-30T02:26:14+5:30
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी होणारा विरोध लक्षात घेता पर्यायी मार्गाने हा महामार्ग वळविण्याबाबत होत असलेली चर्चा शासकीय सूत्रांनी निरर्थक ठरविली

‘समृद्धी’च्या पर्यायी मार्गाची चर्चाच
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जागा देण्यासाठी शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता पर्यायी मार्गाने हा महामार्ग वळविण्याबाबत गेल्या दोन दिवसांपासून होत असलेली चर्चा शासकीय सूत्रांनी निरर्थक ठरविली असून, सध्याची परिस्थिती पाहता ज्या भागातील मोजणी पूर्ण झाली व जागा देण्यास शेतकऱ्यांनी सहमती दर्शविली अशा गावांमध्ये थेट जमीन खरेदीचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिल्यामुळे महामार्ग प्रस्तावित मार्गानेच पुढे सरकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
७१० किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी जमिनीची मोजणी जवळजवळ पूर्ण झाली असून, वर्धा, औरंगाबाद, नगर व नाशिक या चार जिल्ह्णातील जेमतेम ५० ते ६० किलोमीटर जागेच्या मोजणीस जागा मालकांनी हरकत घेत, मोजणी करू देण्यास विरोध दर्शविला असल्याचे शासकीय सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून केलेली तयारी फलद्रूप दिसत असताना समृद्धी महामार्गात बदल होणे अशक्य मानले जात आहे. यासंदर्भात सोशल माध्यमातून होणारी चर्चा शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी किंवा सरकारवर दबाव टाकण्यासाठी होत असल्याची शंका बोलून दाखविली जात असून, उलट दोन दिवसांपूर्वीच मुंबई येथे रस्ते विकास महामंडळाची बैठक होऊन त्यात मोजणीच्या कामाचा आढावा घेऊन ज्या शेतकऱ्यांनी मोजणी करू दिली व जागा देण्यास सहमती दर्शविली अशा शेतकऱ्यांकडून थेट जागा खरेदीचे प्रस्ताव तयार करून ते सादर करण्याच्या सूचना राज्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. समृद्धी महामार्गासाठी शासनाने यापूर्वी लॅण्ड पुलिंगचा प्रस्ताव जागा मालकांसाठी ठेवला होता, परंतु त्यास शेतकरी राजी होत नसल्याने आता थेट खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून, त्यालाही प्रतिसाद न मिळाल्यास भूसंपादन कायद्यान्वये जागा संपादित करण्याचा पर्यायही शासनाने तयार ठेवला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जागा मालकांची सहमती मिळाली तेथील जागा ताब्यात घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.