तलाठी भरतीत जागरूकता, पोलीसपाटीलकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: September 11, 2016 01:21 IST2016-09-11T01:21:37+5:302016-09-11T01:21:51+5:30

अन्यायग्रस्तांचा सवाल : दोषींवर कारवाईबाबत साशंकता

Talathi recruitment awareness, ignore the police force | तलाठी भरतीत जागरूकता, पोलीसपाटीलकडे दुर्लक्ष

तलाठी भरतीत जागरूकता, पोलीसपाटीलकडे दुर्लक्ष

 नाशिक : रविवारी होणाऱ्या तलाठी लेखी परीक्षा व त्यानंतरच्या भरती प्रकियेत पैसे देण्या-घेण्याच्या तक्रारी आल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याची तयारी दर्शविणाऱ्या जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्ण यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या पोलीस भरतीतील गैरप्रकाराचे पुरावे देऊनही साधलेल्या चुप्पीबाबत अन्यायग्रस्तांनी आश्चर्य व्यक्त केले असून, तलाठी भरतीत जर गैरप्रकार झालाच तर दोषींवर कारवाई होईलच, याविषयी शंका घेतली आहे.
तलाठी भरतीत कोणी पैसे देऊन काम करून देण्याचे सांगत असेल तर तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केल्यामुळे या भरतीत असा काही प्रकार घडण्याची शक्यता प्रशासन बाळगून असल्याचा अर्थ त्यातून काढला जात असून, तसे झाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या तयारीत असलेल्यांवर वचक निर्माण होण्यास मदत होईल असे मानावयास हरकत नसली तरी, असे प्रकारचे इशारे पोकळच असतात हे वेळोवेळीच्या घटनेवर स्पष्ट झाले आहेत. जिल्ह्यात गाजलेल्या पोलीस पाटील भरतीत ही बाब प्रकर्षाने समोर आली असून, निफाड व सिन्नर तालुक्यात पात्र उमेदवारांना डावलून अपात्रांना मौखिक परीक्षेत मनमर्जीने गुणदान केल्याचे उघडकीस येऊनही प्रशासन व पर्यायाने जिल्हाधिकाऱ्यांनी बदललेली भूमिका अजूनही अन्यायग्रस्त उमेदवार विसरलेले नाहीत.
विशेष म्हणजे पोलीसपाटील भरतीत अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने चौकशी करून काढलेल्या निष्कर्षाची पूर्तता करण्यासही प्रशासन अकार्यक्षम ठरले तर प्रांत अधिकाऱ्यांनी सहा उमेदवारांच्या फेरमुलाखती घेण्याच्या केलेल्या शिफारशीकडे महिना उलटूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने तलाठी भरतीत होणाऱ्या गैरप्रकाराची तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जाईल वा दोषींवर कारवाई होईलच याची खात्री कोण देईल ? शिवाय अशा प्रकारची तक्रार कोणाकडे व कशी करायची याबाबतही खुलासा व्हावा, अशी मागणी केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Talathi recruitment awareness, ignore the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.