घरपट्टी थकबाकीच्या विरोधात कारवाई सुरू
By Admin | Updated: December 2, 2014 02:02 IST2014-12-02T02:02:02+5:302014-12-02T02:02:27+5:30
घरपट्टी थकबाकीच्या विरोधात कारवाई सुरू

घरपट्टी थकबाकीच्या विरोधात कारवाई सुरू
नाशिक : महापालिकेच्या वतीने घरपट्टी थकबाकीच्या विरोधात कारवाई सुरू झाली असून, २५ कोटी रुपयांच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी २ हजार ५३१ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकीत घरपट्टी आणि पाणीपट्टी हा वादाचा विषय आहे. पालिकेकडून योग्य रीतीने रक्कम वसूल केली जात नसल्याने थकबाकीचा आकडा वाढतच आहे. त्यातच पालिकेची आर्थिक स्थिती सध्या ठीक नसल्याने आता उत्पन्नवाढीसाठी अशा थकीत रकमांच्या मागे पालिका लागली आहे. यंदा ११५ कोटी रुपयांच्या घरपट्टी वसुलीचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २५ कोटी १० लाख रुपयांच्या थकीत रकमेसाठी २ हजार ५३१ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात पूर्व विभागात सर्वाधिक म्हणजेच १ हजार ४८, त्याखालोखाल पश्चिम विभागात ४६३, पंचवटी विभागात ४५५, सिडको विभागात २५३, सातपूर येथे १३४, नाशिकरोड विभागात १७३ मिळकतधारकांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. तीन दिवसांत यासंदर्भात पालिकेने अधिक माहिती न दिल्यास डिमांड नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. थकीत २५ कोटी १० लाख रुपयांच्या एकूण रकमेपैकी १८ कोटी रुपयांची गेल्या वर्षीची थकबाकी आहे, तर ७ कोटी रुपयांची थकबाकी चालू वर्षांची आहे.पंचवीस हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असणाऱ्यांवर पालिकेने हा कारवाईचा बडगा उगारला असून, आता ही पुढील टप्प्यात पंधरा हजार आणि त्यानंतर दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम थकीत असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)