धरणावर मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेस प्रतीकात्मक जलसमाधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:54 IST2018-07-26T00:53:35+5:302018-07-26T00:54:58+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी सकाळी गंगापूर धरणावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राम कदम यांच्या प्रतिमांना प्रतीकात्मक जलसमाधी देत आंदोलन केले़

धरणावर मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेस प्रतीकात्मक जलसमाधी
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी सकाळी गंगापूर धरणावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राम कदम यांच्या प्रतिमांना प्रतीकात्मक जलसमाधी देत आंदोलन केले़ या आंदोलकांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन ओझर पोलीस ठाण्यात नेले होते़ मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असून, सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील युवकाने गोदावरीत उडी घेत आत्महत्या केल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले़ नाशिकबंद आंदोलनप्रसंगी बुधवारी गंगापूर धरणावर कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करीत मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदविला. बुधवारी नाशिक बंदची हाक देण्यात आली होती़ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिक मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, तुषार जगताप, उमेश शिंदे, विजय खर्जुल, मधुकर कासार, मदन गाडे, विकास काळे, वैभव दळवी यासह कार्यकर्त्यांनी गंगापूर धरण गाठले़ आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून फडणवीस सरकारचा निषेध केला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समाजाविरोधात वक्तव्य करणारे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राम कदम यांच्या प्रतिमांना प्रतीकात्मक जलसमाधी देत शासनाचा निषेध नोंदवून घोषणाबाजी केली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले़ मराठा समाजाला आरक्षण, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृह तसेच मराठा समाजातील तरुणांना रोजगार निर्मितीसाठी स्व. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून कर्जवाटप, सारथी संशोधन संस्था कार्यरत करून त्यांचा लाभ, मेगाभरती तत्काळ थांबवावी अशा विविध मागण्या समाजातर्फे करण्यात आल्या.