अंदाज चुकल्याने बसेस माघारी
By Admin | Updated: August 29, 2015 22:27 IST2015-08-29T22:27:05+5:302015-08-29T22:27:41+5:30
चिंचोली फाटा : परजिल्ह्यातील भाविकांचा अल्प प्रतिसाद

अंदाज चुकल्याने बसेस माघारी
सिन्नर : कुंभमेळ्याच्या पहिल्या शाही पर्वणीला पुणे व शिर्डीकडून येणाऱ्या भाविकांचा अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र येथील चिंचोली फाट्यावरील तात्पुरत्या बसस्थानकात दिसून आले. सदर बसस्थानकाहून सुरू असलेल्या बसफेऱ्यांना भाविकांचा अपेक्षित प्रतिसाद न लाभल्याने शंभर बसेस माघारी पाठविण्यात आल्या.
नाशिक-पुणे महामार्गावर चिंचोली फाट्यानजीक उभारण्यात आलेल्या बसस्थानकात दोन दिवसांपूर्वी पुणे विभागाच्या ४०० बसेस दाखल झाल्या होत्या. पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली या पाच आगारांतून बोलाविण्यात आलेल्या बसेसद्वारे चिंचोली फाटा ते नाशिकरोडच्या सिन्नर फाट्यावरील मार्केट यार्डपर्यंत भाविकांना पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, पर्वणीच्या आदल्या दिवशी शुक्रवारीच या सेवेला मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून ४०० पैकी ५० बसेस माघारी पाठविल्या होत्या. शाही पर्वणीच्या पहिल्या दिवशी शनिवारीही फारसा प्रतिसाद न लाभल्याने सकाळी पुन्हा ५० बसेस माघारी पाठविण्यात
आल्या.
तात्पुरत्या बसस्थानकासमोरच खासगी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. या वाहनतळावर जीप, कार व खासगी बसेस लावण्यात येत होत्या. भाविकांना पुढे जाण्यासाठी महामंडळाच्या बसने प्रवास
करावा लागत असल्याने खासगी वाहनतळावर दुपारपर्यंत सुमारे
एक हजारच्या आसपास वाहने
दिसून आली. वाहनतळाचा बराच मोठा भाग मोकळाच दिसून येत
होता.
चिंचोली फाटा ते नाशिकरोडच्या मार्केट यार्डपर्यंत महामंडळाच्या बसेसने सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे २६० फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या अति कडेकोट बंदोबस्ताचा भाविकांनी धसका घेतल्याने कमी प्रतिसाद मिळाल्याची चर्चा होती. (वार्ताहर)