स्वाभीमानी शेतकरी संघटनेची नाशिक जिल्हा बॅँकेला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 15:13 IST2018-03-15T15:13:31+5:302018-03-15T15:13:31+5:30
जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षांनी कर्जवसुली मोहिम हाती घेवून त्यासाठी तालुका निहाय बैठकांचे आयोजन केले असून, बॅँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांकडून शेतक-यांच्या घरी जावून पैशांसाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेची नाशिक जिल्हा बॅँकेला धडक
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मार्च अखेर कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुलीसाठी त्यांचे वाहने व मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने गुरूवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला धडक देत कुलूप लावण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने बॅँकेसमोर निदर्शने करण्यात आली.
या संदर्भात संघटनेच्या पदाधिका-यांनी बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांची भेट घेवून त्यांना निवेदनही सादर केले. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षांनी कर्जवसुली मोहिम हाती घेवून त्यासाठी तालुका निहाय बैठकांचे आयोजन केले असून, बॅँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांकडून शेतक-यांच्या घरी जावून पैशांसाठी दमदाटी केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कर्जवसुलीच्या नावे शेतक-यांना चौकात बेअब्रु केले जात असून, ते त्वरीत थांवावे अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने म्हटले आहे की, शेतक-यांची सक्तीची सुलतानी पद्धतीची कर्ज वसुली थांबवावी, शेतक-यांच्या ट्रॅक्टरचे लिलाव थांबवून ट्रॅक्टर परत शेतकºयांना देण्यात यावे, सन २००३ ते २०१४ या कालावधीत शेतक-यांना कर्ज वाटप करताना त्याची मंजुरी १३ ते १४ लाख रूपयांची असून, शेतक-यांनी ट्रॉलीसाठी कर्ज घेतलेले नसताना त्यांच्या नावावर जास्तीचे कर्ज कसे दाखविण्यात आले याची माहिती द्यावी, बॅँकेच्या स ंचालकांची कर्जाची माहिती प्रसारित करून त्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, कर्जमुक्तीचा शासन निर्णय असताना शेतक-यांना व्याज व दंड, सरचार्जेस या दंडात्मक कारवाया थांबवाव्यात आदी मागण्याही करण्यात आल्या. यावेळी पदाधिका-यांनी बॅँकेच्या मुख्य पाय-यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, दिपक पगार, संदीप जगताप, हंसराज वडघुले, सोमनाथ बोराडे, नाना ताकाटे, सुभाष अहिरे, निवृत्ती गारे, साहेबराव मोरे, निवृत्ती खालकर, श्रावण देवरे, भाऊसाहेब तासकर आदी सहभागी झाले होते.