एसव्हीसी रॉयल्सने खाते उघडले
By Admin | Updated: December 26, 2014 00:18 IST2014-12-25T23:58:57+5:302014-12-26T00:18:43+5:30
सातवा सामना : ७५ धावांनी दणदणीत विजय; सामनावीर आरिफ खानचे शतक हुकले

एसव्हीसी रॉयल्सने खाते उघडले
नाशिक : नाशिक प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत बुधवारी सायंकाळी झालेल्या या स्पर्धेतील सातव्या सामन्यात दि स्टार वॉरियर्स या संघाला ७५ धावांनी नमवून एसव्हीसी रॉयल्स या संघाने या दणदणीत विजय मिळविला.
प्रारंभी नाणेफेक जिंकल्यानंतर एसव्हीसी रॉयल्स या संघाने प्रथम फलंदाजी घेतली.
एसव्हीसी रॉयल्स या संघाने २० षटकांत ४ गडी बाद २०३ धावा केल्या, तर दि स्टार वॉरियर्स या संघाने २० षटकांत ९ गडी बाद १२८ धावात आपला डाव संपविला.
फलंदाजी करताना एसव्हीसी रॉयल्स या संघातील आरिफ खान या खेळाडूने या स्पर्धेतील सर्वाधिक घनाघाती फलंदाजी के ली. त्याने ४३ चेंडूत ९७ धावा केल्या. संघातील मितेश जोंधळे व राहुल कुशवाह या सलामीवीरांनी खेळाला चांगली सुरुवात केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आरिफ खान याने ४३ धावात ९७ धावा करताना ८ उत्तुंग षटकार व ६ चौकार मारून तुफान फटके बाजीचे प्रदर्शन केले. सटाण्यात प्राथमिक क्रिकेटचे धडे गिरवून आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने त्याला यंदा एनपीएल खेळण्याची प्रथमच संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने करून संघाला विजय मिळवून दिला. नीलेश चव्हाण याने २२ चेंडूत ३० धावा केल्या. यात त्याने २ चौकार मारले. प्रशांत नाठे याने ७ चेंडूत १२ धावा केल्या. त्याने मैदानावर आल्यानंतर तडाखे मारायला सुरुवात करताच तो बाद झाला. प्रशांत अपयशी ठरल्यानंतर त्याची जागा आरिफ पठाण याने भरून काढली आणि संघाला सावरताना या स्पर्धेतील धावांचा उच्चांक गाठला. या संघाने १९० धावा केल्या, तर १३ धावा अवांतर मिळाल्या.
दि स्टार वॉरियर्स या संघाकडून गोलंदाजी करताना अमित मैंद व समाधान पांगारे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला, तर सलील आघारकर याने २ गडी बाद केले. दि स्टार वॉरियर्स या संघाकडून फलंदाजी करताना विनय भंबारे याने ११ चेंडूत ३१ धावा केल्या. संघाची पडझड सुरू असतानाच विनय भंबारे मैदानात आला आणि त्याने तुफान फटकेबाजी सुरू केली. ३ उत्तुंग षटकार आणि २ चौकार मारून त्याने झटपट ३१ धावा केल्या; परंतु या धावपळीतच तो बाद झाला. आणि संघाची स्थिती पुन्हा नाजूक झाली. एसव्हीसी रॉयल्सतर्फे गोलंदाजी करताना श्याम झुमनाके याने ३, तर शरद सूर्यवंशी याने २ गडी बाद केले. गौरव काळे, कुणाल कोठावदे व वैभव केंदळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.