स्थायी समितीच्या निर्णयाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2015 00:44 IST2015-07-22T00:44:14+5:302015-07-22T00:44:24+5:30
स्थायी समितीच्या निर्णयाला स्थगिती

स्थायी समितीच्या निर्णयाला स्थगिती
नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेचा ठेका वादग्रस्त वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स या कंपनीला न देता द्वितीय न्यूनतम दर निविदाधारक क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्याबाबत महापालिका स्थायी समितीने दिलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून, याचिका दाखल करून घेतानाच स्थायी समितीला ठराव मागे घेऊन नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यास मुभा दिली आहे. साधुग्राममधील स्वच्छते-संबंधीची तातडीची गरज लक्षात घेता स्थायी समितीच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहणार आहे.
साधुग्राममधील दैनंदिन साफसफाईचा ठेका वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स या कंपनीला देण्यास स्थायी समितीने विरोध दर्शविला होता. सदर कंपनी थकबाकीदार असल्याने आणि फाळके स्मारकातील रेस्टॉरंटच्या ठेक्यावरून कंपनीला काळ्या यादीत टाकले होते.
त्यामुळे वादग्रस्त अशा वॉटर ग्रेसला ठेका न देता द्वितीय न्यूनतम निविदाधारक मुंबईच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रा. लिमिटेड या कंपनीला ठेका देण्याचे आदेश दि. ४ जुलै रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींनी दिले होते. स्थायी समितीच्या या निर्णयाविरुद्ध वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्सचे संचालक चेतन बोरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी होताना महापालिकेने स्थायी समितीच्या सदस्यांचेही म्हणणे न्यायालयात मांडले होते. स्थायीच्या सभेमध्ये विरोधाची भूमिका घेणारे प्रा. कुणाल वाघ व राहुल दिवे यांनी न्यायालयात आपली बाजूही पत्राद्वारे मांडली होती. मंगळवारी याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने स्थायी समितीने द्वितीय न्यूनतम दर निविदाधारकास ठेका देण्यासंबंधीच्या दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली असून, याचिका पुढील सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. मात्र, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समितीला सदर ठराव मागे घेऊन त्यावर फेरविचार करण्याचीही मुभा दिली असल्याची माहिती महापालिकेचे वकील जे. शेखर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्थायी समितीला आता आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार असून, समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहणार आहे. (प्रतिनिधी)