नाशिकच्या व्यावसायिकाची लूट करणाऱ्या संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:48 IST2020-11-21T21:41:50+5:302020-11-22T01:48:20+5:30
वणी : दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावर शस्राचा धाक दाखवून नाशिकच्या व्यावसायिकाची जबरी लूूट करणाऱ्या संशयितास मुंबईच्या वसई भागातून अटक करण्यात आली असून, स्थानिक गुन्हा शाखेने समांतर तपासात ही कारवाई केली.

नाशिकच्या व्यावसायिकाची लूट करणाऱ्या संशयितास अटक
वणी : दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावर शस्राचा धाक दाखवून नाशिकच्या व्यावसायिकाची जबरी लूूट करणाऱ्या संशयितास मुंबईच्या वसई भागातून अटक करण्यात आली असून, स्थानिक गुन्हा शाखेने समांतर तपासात ही कारवाई केली.
सोमवारी (दि. १६) पंचवटी कारंजा, नाशिक येथे वास्तव्यास असलेले उमेश चंद्रकांत गाडे हे दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर ते आपल्या इनोव्हा कारकडे येत असताना त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या चार संशयितांनी आम्हाला नाशिकला सोडता काय ? अशी विचारणा केली व पिस्तुल व चॉपरचा धाक दाखवुन त्यांच्या कारचा ताबा घेतला. त्यांचे हातपाय व डोळे बांधुन रोख रक्कम चांदीचे कडे, अंगठी, भ्रमणध्वनी काढून घेतल्या व मुंबई - आग्रा महामार्गावर त्यांना सोडून देत कार घेऊन पोबारा केला. पाच लाख पाच हजार ४०० रुपयांची जबरी लूट व आर्म ॲक्टनुसार दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेची दखल पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घेत समांतर तपासाचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेला दिले. गुन्ह्याची पद्धत व फिर्यादीने नमूद केलेले संशयितांचे वर्णन त्यांची देहबोली यावरून सराईत टोळीचे काम असल्याच्या निष्कर्षांपर्यंत पोलीस पोहोचले. जबरी लूट व हत्यार प्रतिबंधक कायद्यान्वये करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक ते महामार्गपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर इनोव्हा मुंबई भागात असल्याची माहिती मिळाली. मुंबईच्या अंधेरी परिसरात चौकशी करण्यात आली, मात्र गुन्ह्याचा एक धागा मिळाला व गुप्त खबऱ्यामार्फत सदर इनोव्हा वसई विरार परिसरात असल्याची माहिती मिळाली. जुहु पोलिसांच्या मदतीने अमन हिरालाल वर्मा (३५) समतानगर, गुलमोहोर, क्रॉस रोड अंधेरी वेस्ट येथे वास्तव्यास असलेल्या प्रमुख संशयितास ताब्यात घेतले. त्याची झडतीतून देशी बनावटीचे पिस्तूल, चॉपर, चाकू, स्क्रू ड्रायव्हर, दोन जिवंत काडतुसे, दोन भ्रमणध्वनी असा ऐवज जप्त केला आहे. अमन वर्मा हा सराईत असून, मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक सचिन पाटील पोलीस निरीक्षक के.के. पाटील, रवि शिलावट, दीपक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर, हेमंत गिलबिले, सचिन पिंगळ, संदीप हांडगे, प्रदीप बहिरम, अमोल घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.