नाशिकमध्ये पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:50 IST2017-12-01T13:47:47+5:302017-12-01T13:50:38+5:30
गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक वर सदरची चित्रफित व्हायरल झाल्याने पुरवठा खात्यात सारेच अलबेल आहे असे नसून, आजवर केल्या जाणा-या पुरवठा खात्यातील भ्रष्टाचारावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

नाशिकमध्ये पुरवठा निरीक्षकाची पैशांची क्लिप व्हायरल
नाशिक : शहर धान्य वितरण कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षकाने चलन भरण्यासाठी आलेल्या रेशन दुकानदारांकडे उघड उघड पैशांची मागणी केल्याची व्हिडीओ चित्रफीत फेसबुकवर व्हायरल झाल्याने त्याची जोरदार चर्चा रेशन दुकानदारांमध्ये होत असून, या सा-या प्रकाराबाबत मात्र वरिष्ठ अधिका-यांनीही सोयीस्कर कानाडोळा केल्याने त्यांचीच यामागे फूस असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सदर कार्यालयीन अधिक्षकाने आजवरचा सेवा कालावधी पुरवठा खात्याच्या चरणीच घातल्यामुळे की काय मर्जी म्हणून त्यांच्याकडे पुरवठा निरिक्षकाचा अतिरीक्त पदभार देवून वरिष्ठांनी उपकृत केले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून फेसबुक वर सदरची चित्रफित व्हायरल झाल्याने पुरवठा खात्यात सारेच अलबेल आहे असे नसून, आजवर केल्या जाणा-या पुरवठा खात्यातील भ्रष्टाचारावर त्यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. रेशन दुकानदारांकडून नागरिकांचे आधारकार्ड गोळा करून त्याची संगणकात नोंद करण्याचे काम पुरवठा खात्याकडून केले जात आहे. सदर काम ठेकेदाराकरवी व पुरवठा खात्याच्या निधीतून केले जाणार असले तरी, या कामासाठी संबंधित दुकानदारांनी पैसे द्यावेत असा आग्रह पुरवठा खात्याकडून धरला जात आहे. याचाच संदर्भ या चित्रफितीत आहे तसेच चलन पास करण्यासाठी द्यावी लागणारी चिरीमीरी देखील त्यातून स्पष्ट झाली आहे. शहर धान्य वितरण कार्यालयात कार्यालयीन अधिक्षक असलेले शेख यांच्याविषयी यापुर्वीही तक्रारी झाल्या असून, त्यांच्या विरोधात यापुर्वी काही दुकानदारांनी उपोषणास्त्र उगारूनही त्याला पाठीशी घालण्यात आल्याने आत्ताही चित्रफित व्हायरल होऊनही शेख याच्यावर कारवाई होण्याच्या शक्यतेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. या चित्रफितीत दुकानदार शेख याच्या ताब्यात पैसे देत असल्याचे व शेखने सदरचे पैसे मोजून खिशात ठेवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याशिवाय आधारकार्डाची नोंदणी करण्यासाठी पैसे देणार नसाल तर तुमचा ‘डाटा फ्रीज’ करून टाकतो असा दम देतानाच, दुकानदारांकडे पैसे मागत असताना शेख याने ‘गेल्या वेळी मला एक लाख, ६० हजार रूपये भरावे लागले’ असे सांगतानाही दिसत आहे. ज्या दुकानदाराने शेख याची चित्रफित काढली त्याचा शोध पुरवठा खात्याकडून घेतला जात असून, ज्या दुकानदाराने चित्रफित फेसबुकवर टाकली त्याचे फेसबुक अकॉऊंट हॅक करून त्यातील चित्रफित नष्ट करण्याचा प्रयत्नही अज्ञात इसमांकडून केला गेला, परंतु तो पर्यंत ती चित्रफित सर्वच रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचली आहे.