विजेच्या तारांमुळे अडले रविवार कारंजा रस्त्याचे घोडे
By Admin | Updated: February 12, 2015 00:49 IST2015-02-12T00:24:21+5:302015-02-12T00:49:35+5:30
नागरिकांचे हाल : पालिकेनेही केले हात वर; महावितरणकडे ताराच शिल्लक नाहीत

विजेच्या तारांमुळे अडले रविवार कारंजा रस्त्याचे घोडे
नाशिक : शहरातील महत्त्वाच्या अशा अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यानच्या रस्ता कॉँक्रिटीकरणाचे काम आता महावितरणमुळे खोळंबले आहे. विजेच्या तारा भूमिगत करण्यासाठी महावितरणकडे ताराच शिल्लक नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, रहदारीच्या या मार्गावरील नागरिकांना रस्त्याच्या अर्धवट कामामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, महापालिकेने त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या वतीने कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण आणि काही भागात कॉँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्याच अंतर्गत अशोकस्तंभ ते रविवार पेठ दरम्यान कॉँक्रिटीकरणाचे काम तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता वाहता आहे. हा रस्ता बंद करून वाहतूक घारपुरे घाटाकडून वळविण्यात आल्याने आधीच गोंधळ होत आहे. त्यातच अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यान शेकडो नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापलीकडे जाऊन नाशिकचा घाऊक बाजार येथे असून तेल, तूप, गूळ, तांदळासह अन्य अनेक अन्न-धान्याची बाजारपेठ येथे आहे.
रस्ता बंद असल्याने आणि अर्धवट कामामुळे त्यांना या रस्त्यावरून माल ने-आण करणे अडचणीचे ठरले आहे. तरीही शहरच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता असल्याने त्याचे काम चांगलेच व्हावे, यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तथापि, या रस्त्याचे काम रखडल्याने ते कधी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॉँक्रिटीकरण केल्यानंतर ते काम दीर्घकाळ टिकते त्यामुळे रस्ता होण्याच्या आत गटारींची कामे, मलवाहिका टाकणे तसेच विजेच्या तारा भूमिगत करणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. तथापि, महावितरणचे काम रखडल्याने रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात या भागातील नागरिकांनी मंगळवारी खरवंदा पार्क येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनुले यांची भेट घेतली आणि वीज तारांचे काम का रखडले, अशी विचारणा केली, त्यावर त्यांनी महावितरणकडे या कामासाठी ताराच शिल्लक नाही आणि आता नवीन प्राकलन बनवावे लागेल, असे उत्तर दिल्याने नागरिक सर्द झाले आहेत. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)