मेशी - देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह परिसरात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मेशी गाव डोंगराजवळ वसलेले असल्याने उन्हांची तीव्रता अधिकच जाणवते. मागील वर्षी जोरदार पाऊस झाल्याने या वर्षी बागायती क्षेत्रातही वाढ झाली आहे. अजूनही विहिरींना भरपूर पाणी आहे. त्यामुळे रबबी हंगामातील पिके जोरदार आहेत. गव्हाचे, हरभरा पिकांचे उत्पादन वाढले आहे. कांदा पिकाचीही मोठया प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. सध्या गहू ,हरभरा, कांदा काढणीचे कामे जोरदार सुरू आहेत. उन्हाचे चटके बसत असूनही कामांची लगबग सुरू आहे. याशिवाय लाल कांदा, उन्हाळी कांदा काढणीचे कामे जोरदार सुरू आहेत. काही प्रमाणात लागवडीचे कामेही चालू आहेत. तो कांदा मात्र बेभरवशाचा राहाणार असून उशिरा निघणार आहे. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. मजुरांची टंचाईमुळे बरिचशी कामे यांत्रिक पध्दतीने केली जात आहे. सध्या उन्हामुळे सकाळी लवकर उठून कामे उरकली जात आहेत. दिवसभर कडक उन्हाचे चटके बसत असूनही रात्री आणि सकाळी थंड गारवा जाणवत असल्याने दुहेरी विचित्र वातावरण अनुभवयास मिळत आहे. कांद्याचे चढउतार बाजारभावामुळे शेतकरी नेहमी चिंताग्रस्त असतात. अजूनतरी हवामान चांगले असल्याने पिके सर्वच जोमात आहेत. यावर्षी उन्हाळा कसा राहील याचे खरे चित्र थोड्याच दिवसात समजेल. मात्र सध्या विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे विहिरींना पाणी असुनही वेळेवर पाणी देता येत नाही. रात्री अपरात्री जागुन पिकांना पाणी शेतकरी देत आहेत.
मेशीसह परिसरात उन्हाळ्याची चाहूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 13:14 IST